
Asia Cup 2025 Prize Money : 9 सप्टेंबर रोजी आशिया कप 2025 ची सुरुवात झाली. आज रविवारी, 28 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान तिसऱ्यांदा भिडतील. दोन्ही देशात आज अंतिम सामना (Asia Cup Final) खेळला जाईल. पहलगाम हल्ल्यानंतर आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या खेळण्यावर क्रिकेट प्रेमी आणि नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वीच्या सामन्यांचा जल्लोष आणि उत्साह दिसून आलेला नाही. पहेलगाम हल्ल्यानंतर आशिया कपावर बहिष्कार टाकण्याची मागणी देशभरातून झाली. पण BCCI ने त्याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी या सामन्यांकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते. या अंतिम सामन्यात विजेत्या संघाला इतक्या कोटींचे बक्षीस (Asia Cup 2025 Prize Money) मिळेल. तर पराभूत संघाला ही इनाम मिळेल.
आशिया कप 2025
सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी आशिया कपच्या बक्षीस रक्कमेत मोठी वाढ झाली आहे. भारत विरुद्ध पाकिस्तानच्या अंतिम सामन्यात विजेत्या संघाला जवळपास 2.6 कोटी रुपयांचा इनाम मिळेल. तर उपविजेत्या, पराभूत संघाला जवळपास 1.30 कोटी रुपये मिळतील. आशिया क्रिकेट परिषदेने याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. ही आकडेवारी सूत्रांनी दिलेली आहे.
मागील आकडेवारीवर नजर टाकली असता ही रक्कम जवळपास दुप्पट असल्याचे दिसते. 2023 मधील आशिया कप जिंकल्यावर टीम इंडियाला जवळपास 1.25 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले होते. याशिवाय प्लेअर ऑफ द सीरीज खेळाडूला 12.5 लाखांचा पुरस्कार मिळेल. सध्या अभिषेक शर्मा आणि कुलदीप यादव हे दोन्ही खेळाडू प्लेअर ऑफ द सीरीजच्या स्पर्धेत आघाडीवर आहेत.
विजेता संघ – 2.6 कोटी
उपविजेता संघ – 1.3 कोटी
प्लेअर ऑफ द सीरीज – 12.5 लाख
भारताने सुपर 4 मध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशानंतर श्रीलंकेला हरवले. गट अ मध्ये सुद्धा भारतीय संघाने विजय मिळवला. सुपर – 4 गुणतालिकेत टीम इंडियाचा दबदबा दिसून आला. आशिया चषकात 6 गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे. तर दोन सामने जिंकणारा पाकिस्तान गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंका सर्वात खालच्या स्थानावर आहे. आशिया कप 1984 पासून सुरू झाला. 41 वर्षांत भारत आणि पाकिस्तान कधीच आशिया कपच्या अंतिम सामन्यात एकमेकांसमोर आले नाही. यंदा मात्र दोन्ही संघ विजेतेपदासाठी झुंजणार आहे.