
पर्थमध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातून टीम इंडियाच्या विराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीने तब्बल 223 दिवसांनी पुनरागमन केलं. टीम इंडियाचा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतरचा हा पहिलाच एकदिवसीय सामना असल्याने विराट आणि रोहितच्या कमबॅकची क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा होती. टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध टॉस गमवावा लागला. मात्र ऑस्ट्रेलिया कॅप्टन मिचेल मार्श याने टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडल्याने भारतीय चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली. रोहित आणि विराटला बॅटिंग करताना पाहायला मिळेल, म्हणून चाहते आनंदी झाले. मात्र हा आनंद फार मिनिटंही राहिला नाही.
टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने ठिकठाक सुरुवात केली. मात्र जोश हेझलवूड याने टीम इंडियाला सामन्यातील चौथ्या ओव्हरमध्ये पहिला झटका दिला. हेझलवूडने रोहितला 8 धावांवर रेनशॉच्या हाती कॅच आऊट केलं. रोहितनंतर विराट मैदानात आला. विराट मैदानात येताच चाहत्यांकडून जल्लोष करण्यात आला. रोहित अपयशी ठरल्याने विराटकडून चाहत्यांची अपेक्षा वाढली.
विराटला जोरदार संघर्ष करावा लागला. विराटने 7 चेंडू खेळले. मात्र त्यानंतरही विराटचं खातं उघडलं नाही. विराटसमोर सर्वात आधी खातं उघडण्याचं आव्हान होतं. याच प्रयत्नात विराट त्याच्या खेळीतील आठव्या बॉलवर कॅच आऊट झाला. विराट भोपळाही फोडू शकला नाही. मिचेल स्टार्कने विराटला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. स्टार्कने विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आऊट करण्याची एकूण आठवी तर वनडेतील दुसरी वेळ ठरली. तसेच विराटची ही ऑस्ट्रेलियात एकदिवसीय क्रिकेटमध्ये झिरोवर आऊट होण्याची पहिली वेळ ठरली.
विराटसाठी आगामी वनडे वर्ल्ड कप 2027 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही मालिका निर्णायक समजली जात आहे. विराट पहिल्या सामन्यात अपयशी ठरला. त्यामुळे विराटसमोर दुसऱ्या सामन्यात कमबॅक करण्याचं आव्हान असणार आहे.
दरम्यान विराटकडून या सामन्यात चाहत्यांना शतकी खेळीची आशा होती. त्याचं कारणही तसंच होतं. विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय सामन्यांमधील गेल्या 5 डावात 50 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. मात्र विराट या 5 पैकी एकाही डावात शतकापर्यंत पोहचू शकला नव्हता. त्यामुळे विराटने ही मालिका तोडून आता शतक करावं, अशी आशा होती. मात्र विराटला खातंही उघडता आलं नाही.