AUS vs IND : भारताचा सलग दुसऱ्या पराभवासह मालिका पराभव, ऑस्ट्रेलिया 2 विकेट्सने विजयी

Australia vs India 2nd ODI Match Result : टीम इंडिया या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर असल्याने दुसरा सामना करो या मरो असा होता. मात्र ऑस्ट्रेलियाने एडलेडमध्ये भारतावर मात करत मालिकाही आपल्या नावावर केली.

AUS vs IND : भारताचा सलग दुसऱ्या पराभवासह मालिका पराभव, ऑस्ट्रेलिया 2 विकेट्सने विजयी
India vs Australia Odi
Image Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Oct 23, 2025 | 5:51 PM

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने एडलेडमध्ये झालेल्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियावर 2 विकेट्सने मात केली आहे. टीम इंडियाने कांगारुंना विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 22 बॉलआधी 2 विकेट्स राखून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने 46.2 ओव्हरमध्ये 265 धावा केल्या.  ऑस्ट्रेलियाचा हा सलग दुसरा विजय ठरला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिका आपल्या नावावर केली. ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडी घेतली. तर शुबमन गिल कर्णधार म्हणून पहिल्याच मालिकेत अपयशी ठरला. तसेच टीम इंडियाचा हा एडलेडमधील 2008 नंतरचा पहिलाच पराभव ठरला. टीम इंडिया एडलेडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अजिंक्य होती. मात्र ऑस्ट्रेलियाने मात करत भारताची एडलेडमधील विजयाची मालिका खंडीत केली.

ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅथ्यू शॉर्टने बॅटिंगने प्रमुख भूमिका बजावली. मॅथ्यूने 78 बॉलमध्ये 74 रन्स केल्या. तर कूपर कॉनोली याने अखेरपर्यंत नाबाद राहून ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत पोहचवलं. कूपरने 53 बॉलमध्ये 61 रन्स केल्या. मिचेल ओवनने 36 धावांचं योगदान दिलं. मॅट रेनशॉ याने 30 धावा केल्या. तर ट्रेव्हिस हेड याने 28 धावा केल्या.  कॅप्टन मिचेल मार्शने 11 धावा केल्या. तसेच इतरांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. मात्र इतरांनीही ऑस्ट्रेलियाच्या विजयात योगदान दिलं. भारताकडून अर्शदीप सिंह, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

टीम इंडियाची बॅटिंग

त्याआधी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी भाग पाडलं. भारताने 9 विकेट्स गमावून 264 धावा केल्या. टीम इंडियाने संथ सुरुवातीनंतर 17 धावांवर झटपट 2 विकेट्स गमावल्या. कॅप्टन शुबमन गिल 9 रन्सवर आऊट झाला. विराट कोहली याला सलग दुसऱ्या सामन्यातही भोपळा फोडता आला नाही. श्रेयस अय्यर आणि रोहित शर्मा या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 118 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर रोहित 73 रन्सवर आऊट झाला. रोहितनंतर श्रेयस आऊट झाला. श्रेयसने 61 धावा केल्या

हर्षित-अर्शदीपची निर्णायक भागीदारी

अक्षर पटेलने 44 धावांचं निर्णायक योगदान दिलं. केएल राहुल याने 11 तर वॉशिंग्टन सुंदरने 12 धावा केल्या. नितीश रेड्डी याने 8 धावा जोडल्या. तर अखेरच्या क्षणी हर्षित राणा आणि अर्शदीप सिंह या जोडीने नवव्या विकेटसाठी 37 रन्सची पार्टनरशीप केली. हर्षितने नाबाद 24 धावा केल्या. तर अर्शदीपने 13 रन्स केल्या. या जोडीमुळे भारताला 230 पार पोहचता आलं.

भारताने सामना आणि मालिका गमावली

ऑस्ट्रेलियाकडून एडम झॅम्पा याने सर्वाधिक भारतीय फलंदाजांना आऊट केलं. झॅम्पाने 4 विकेट्स घेतल्या. झेव्हीयर बार्टलेट याने 3 विकेट्स मिळवून झॅम्पाला चांगली साथ दिली. तर मिचेल स्टार्कने 2 विकेट्स मिळवल्या.