
टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरूद्ध सलग 2 पराभवांसह एकदिवसीय मालिका गमावली आहे. आता टीम इंडियासमोर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात पराभवाची हॅटट्रिकसह क्लिन स्वीप टाळण्याचं दुहेरी आव्हान आहे. शुबमन गिल याच्या नेतृत्वात भारताला मालिका वाचवण्यात अपयश आलं. मात्र आता तिसरा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले जाऊ शकतात. दुसऱ्या वनडेत फिरकीपटू कुलदीप यादव याला संधी न दिल्याने हेड कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन शुबमन गिल या दोघांवर टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता तरी कुलदीपला संधी दिली जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच कुलदीपसाठी कुणाला बाहेर केलं जाऊ शकतं? हे समजून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा सामना हा 25 ऑक्टोबरला सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात येणार आहे. कुलदीपला अखेरच्या सामन्यात संधी मिळू शकते. कुलदीपने आशिया कप 2025 आणि वेस्टइंडिज विरुद्ध उल्लेखनीय कामगिरी केली होती. मात्र त्यानंतरही कुलदीपला ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या 2 सामन्यात संधी मिळाली नाही. गंभीर आणि गिलच्या या निर्णयामुळे संताप व्यक्त करण्यात आला. तसेच आश्चर्य व्यक्त करण्यात आलं.
एडलेडमधील खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल होती. याच खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या एडम झॅम्पा याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. मात्र कुलदीपला संधी मिळाली नाही. भारताला कुलदीपची या सामन्यात 264 धावांचा बचाव करताना चांगलीच उणीव जाणवली. कुलदीप दुसऱ्या सामन्यात असता तर कदाचित निकाल वेगळा असता.
तसेच सिडनी क्रिकेट ग्राउंडमधील खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंट कुलदीपला संधी देणार की दुसर्या सामन्यातील चुक पुन्हा करणार? याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
कुलदीपसाठी टीममधून वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा या दोघांपैकी एकाला बाहेर केलं जाऊ शकतं. सुंदरने या मालिकेतील 2 सामन्यांमध्ये 9 ओव्हर बॉलिंग केलीय. सुंदरने 22 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्यात. तर हर्षित राणा याला बॉलिंगने काही खास करता आलेलं नाही. त्यामुळे आता गिल आणि गंभीर काय निर्णय घेतात? हे टॉसनंतरच स्पष्ट होईल.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद सिराज.