AUS vs SA : तिसऱ्या सामन्यात दोन्ही पराभवांचा हिशोब, कांगारुंकडून फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 276 धावांनी धुव्वा
Australia vs South Africa 3rd ODI Match Result : ऑस्ट्रेलियाने मॅकेतील ग्रेट बॅरियर रीफ अरेना इथे झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय मिळवला. कांगारुंनी या विजयासह दक्षिण आफ्रिकेला 3-0 ने मालिका जिंकण्यापासून रोखलं.

यजमान ऑस्ट्रेलियाने पहिल्या 2 सलग पराभवांची अचूक परतफेड करत एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेला विजयी हॅटट्रिक करण्यापासून रोखलं आणि ऐतिहासिक फरकाने सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर 432 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेला निम्मे षटकंही खेळता आली नाहीत. कांगारुंनी दक्षिण आफ्रिकेला 24.5 ओव्हरमध्ये 155वर गुंडाळलं आणि 276 धावांनी हा सामना जिंकला. कांगारुंनी या सामन्यासह क्लीन स्वीप होण्याची नामुष्की टाळली. तर दक्षिण आफ्रिकेने 2-1 ने मालिका जिंकली. दक्षिण आफ्रिकेने पहिले सलग 2 सामने जिंकत मालिका नावावर केली होती.
टॉप 3 फलंदाजांनी केलेल्या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्स गमावून 432 पर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेकडून एकालाही अर्धशतकही करता आलं नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेसाठी डेवाल्ड ब्रेव्हिस याने सर्वाधिक 49 धावा केल्या. तर टॉनी डी झॉर्झी याने 33 धावांचं योगदान दिलं. या दोघांशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या एकालाही 20 धावाही करता आल्या नाहीत. ऑस्ट्रेलियासाठी कूपर कॉनोली याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. झेव्हीयर बार्टलेट आणि सिन एबोट या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर एडम झॅम्पा याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
ऑस्ट्रेलियाची खणखणीत सुरुवात
त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. ट्रेव्हिस हेड आणि कर्णधार मिचेल मार्श या जोडीने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई करत रडकुंडीला आणलं. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 250 धावांची भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी वैयक्तिक शतकं झळकावली. मात्र केशव महाराज याने हेडला आऊट केलं. केशवने हेडला 35 व्या षटकातील पहिल्याच बॉलवर डेवाल्ड ब्रेव्हीस याच्या हाती कॅच आऊट केलं आणि डोकेदुखी ठरलेली जोडी फोडली. हेडने 5 सिक्स आणि 17 फोरच्या मदतीने 103 बॉलमध्ये 142 रन्स केल्या. त्यानंतर 37 व्या ओव्हरमध्ये मिचेल मार्श हा देखील आऊट झाला. मार्शने 106 चेंडूत 5 षटकार आणि 6 चौकारांसह 100 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामन्यात पहिला विजय
🚨 MATCH RESULT 🚨
A fantastic series wraps up in Mackay, with Australia taking the final ODI by 276 runs. 🏏🔥
It’s the Proteas who sealed a hard-fought ODI series triumph on Australian soil 2-1. 💪🇿🇦#WozaNawe pic.twitter.com/7h1QsoW8hp
— Proteas Men (@ProteasMenCSA) August 24, 2025
त्यानंतर कॅमरुन ग्रीन आणि एलेक्स कॅरी या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी नॉट आऊट 164 रन्सची पार्टनरशीप केली आणि ऑस्ट्रेलियाला 50 ओव्हरमध्ये 431 पर्यंत पोहचवलं. ग्रीनने अवघ्या 55 चेंडूत 8 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 118 धावा केल्या. तर एलेक्स कॅरी याने 7 चौकारांसह नाबाद 50 धावांचं योगदान दिलं. दक्षिण आफ्रिकेसाठी केशव महाराज आणि सेनुरन मुथीसामी या दोघांनी 1-1 विकेट मिळवली.
