
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी 20i सामना शुक्रवारी 23 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचा थरार हा रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. अशात भारताचं नागपूरनंतर रायपूरमध्ये विजय मिळवत मालिकेतील आघाडी आणखी मजबूत करण्यावर लक्ष असणार आहे. मात्र भारतीय संघात दुसऱ्या सामन्यासाठी नाईलाजाने 1 बदल करावा लागणार असल्याची चिन्हं आहेत.
भारताचा उपकर्णधार आणि ऑलराउंडर अक्षर पटेल याला दुखापतीमुळे दुसऱ्या टी 20i सामन्यातून बाहेर व्हावं लागू शकतं. अक्षरला नागूपरमध्ये फिल्डिंग दरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे अक्षरला मैदानाबाहेर जावं लागलं. त्यामुळे अक्षरची दुसऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र बीसीसीआयकडून अक्षरच्या दुखापतीबाबत कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही.
उभयसंघातील पहिला सामना हा 21 जानेवारीला नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. अक्षरला या सामन्यातील दुसऱ्या डावात आपल्याच बॉलिंगवर दुखापत झाली. अक्षरने न्यूझीलंडच्या फलंदाजाने मारलेला फटका रोखण्याच्या प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात अक्षरच्या बोटावर बॉल लागला. त्यामुळे अक्षरच्या बोटातून रक्त वाहू लागलं. त्यामुळे अक्षरवर मैदान सोडून बाहेर जाण्याची वेळ आली. त्यानंतर आतापर्यंत बीसीसीआयकडून अक्षरबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे अक्षर खेळणार की नाही? हे नक्की नाही. मात्र अक्षरला या दुसऱ्या सामन्यातून बाहेर व्हावं लागल्यास त्याच्या जागी कुणाला संधी मिळणार? हे जाणून घेऊयात.
दरम्यान अक्षर पटेल खेळणार की नाही? हे टॉसनंतरच स्पष्ट होईल. मात्र नाईलाजाने अक्षरला बाहेर व्हावं लागलं तर त्याच्या जागी कुलदीप यादव याला संधी मिळू शकते. आता रायपूरमध्ये अक्षरबाबत काय होतं? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दुसऱ्या टी 20i सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंह, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि वरुण चक्रवर्ती.