BBL 15: करो या मरोच्या सामन्यात 83 धावांवर खेळ खल्लास, या गोलंदाजाने 4 षटकात बाजी फिरवली
बिग बॅश लीग स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेतील करो या मरोच्या सामन्यात मेलबर्न स्टार्स आणि एडिलेड स्ट्रायकर्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात मेलबर्न स्टार्सने बाजी मारली आणि बाद फेरीत स्थान पक्कं केलं.

बिग बॅश लीग 2025-26 स्पर्धेत मेलबर्न स्टार्स आणि एडिलेड स्ट्रायकर्स या संघांचा सामना झाला. हा सामना एडिलेड स्ट्रायकर्स संघांसाठी करो या मरोची लढाई होती. कारण या सामन्यातील पराभव म्हणजे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार हे स्पष्ट होतं. पण या सामन्यात एडिलेड स्ट्रायकर्सने सुमार कामगिरी केली. यामुळे पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या सामन्यात नाणेफेकीचा कौल मेलबर्न स्टार्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय योग्यच ठरला. कारण एडिलेड स्ट्रायकर्सच्या फलंदाजांना डोकंच वर काढू दिलं नाही. एडिलेड स्ट्रायकर्सचा संघ अवघ्या 83 धावांवर सर्वबाद झाला. तसेच विजयासाठी 84 धावांचं सोपं आव्हान दिलं. हे आव्हान मेलबर्न स्टार्सने 6 विकेट राखून 15.1 षटकात पूर्ण केलं. तसेच बाद फेरीत जागा पक्की केली.
बिग बॅश लीगमध्ये एडिलेड स्ट्रायकर्सने प्रथम फलंदाजीला सुरुवात केली. पण पॉवर प्लेच्या 6 षटकातच 4 विकेट गमावल्या. तसेच फक्त 21 धावा करता आल्या. 10 व्या षटकात पाचवी विकेट पडली. तेव्हा फक्त 40 धावांपर्यंत मजल मारता आली होती. सुरूवातीच्या 10 षटकात एडिलेड स्ट्रायकर्सला बॅकफूटवर ढकलण्यात मेलबर्नचा वेगवान गोलंदाज टॉम करनची महत्त्वाची भूमिका ठरली. इंग्लंडच्या गोलंदाजाने पहिल्या 10 षटकात 4 षटकं टाकून मोकळा झाला होता. यात त्याने पाच पैकी 4 गडी बाद केले होते. तसेच फक्त 10 धावा दिल्या. तर फिरकीपटू मिचेल स्वेपसनने आपल्या जाळ्यात फलंदाजांना गुंतवलं. त्यामुळे 55 धावांवर 9 विकेट पडल्या. पण शेवटी कॅमरन बॉयसने 20 धावा केल्या. त्यामुळे 83 धावांपर्यंत मजल मारता आली.
विजयी धावांचा पाठलाग करताना मेलबर्न स्टार्सची सुरुवात काही चांगली झाली नाही. 13 धावांवर दोन विकेट पडल्या होत्या. सॅम हार्पर 9 धावांवर बाद झाला, तर कॅम्पबेल केल्लावेला आपलं खातंही खोलता आलं नाही. 43 धावांवर तिसरी विकेट तंबूत गेली होती. पण थॉमर फ्रेझर रॉजर्सने 32 धावांची खेळी केली. तर मार्कस स्टोयनिस 23 धावा करून रिटायर्ड हर्ट झाला. या दोघांनी 34 धावांची भागीदारी केल्याने संघाचा डाव सावरला. शेवटी टॉम करनने नाबाद 9 धावांची खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.
