BCCI : भारताच्या दोन मोठ्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा परतणार, बीसीसीआयनं तयार केला मास्टर प्लॅन, जाणून घ्या…
8 सप्टेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या दुलीप ट्रॉफीनं पुरुषांच्या वरिष्ठ हंगामाची सुरुवात करण्याचा मंडळाचा विचार आहे. बीसीसीआय 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान इराणी चषक आयोजित करण्याचा विचार करत आहे, असं बीसीसीआयनं म्हटलंय.

मुंबई : भारतात (India) कोरोनाचा (Corona) आल्यानंतर देशांतर्गत क्रिकेटला (Cricket) मोठा फटका बसला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कसेतरी सुरू झालं होतं. पण देशांतर्गत स्पर्धा सुरू होण्यास विलंब झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एका वर्षाच्या कालावधीनंतर यावर्षी रणजी ट्रॉफीचे आयोजन केलं आणि आता त्याचप्रमाणे, भारतीय मंडळ आता आणखी दोन मोठ्या देशांतर्गत स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे. बीसीसीआय प्रतिष्ठित दुलीप ट्रॉफी आणि इराणी चषक पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे. तसेच, रणजी ट्रॉफीचा हंगाम पूर्वीप्रमाणेच आगामी देशांतर्गत हंगामात आयोजित करण्याची त्याची योजना आहे. दुलीप ट्रॉफी आणि इराणी चषक किमान तीन हंगाम आयोजित केलं गेलं नाहीत तर बीसीसीआयला कोरोना साथीच्या आजारामुळे 2020 मध्ये प्रथमच रणजी हंगाम रद्द करावा लागला. बीसीसीआयने गेल्या रणजी हंगामाचा कालावधी कमी केला होता. बीसीसीआयने गुरुवारी झालेल्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत या मुद्द्यांवर विचार केला. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितलं की 2022-23 मध्ये संपूर्ण देशांतर्गत हंगाम आयोजित केला जाईल. यावेळी मध्य प्रदेशने रणजी करंडक जिंकला होता. मध्य प्रदेशच्या टीमने पहिल्यांदाच हे काम केलं.
8 सप्टेंबरपासून…
8 सप्टेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या दुलीप ट्रॉफीनं पुरुषांच्या वरिष्ठ हंगामाची सुरुवात करण्याचा मंडळाचा विचार आहे. यासोबतच बीसीसीआय 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान इराणी चषक आयोजित करण्याचा विचार करत आहे. यापूर्वी दुलीप ट्रॉफी पाच विभागांमध्ये बाद पद्धतीनं आयोजित करण्यात आली होती. परंतु नंतर हा तीन संघांचा सामना बनला ज्यामध्ये अव्वल दोन संघ राऊंड-रॉबिन स्वरूपाच्या आधारे अंतिम फेरीत पोहोचले. इराणी चषकात सध्याच्या रणजी चॅम्पियनचा सामना बाकीच्या भारतीय संघाशी आहे.
या गोष्टींवरही चर्चा
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफी आयोजित करण्याच्या पर्यायावरही चर्चा झाली. मुश्ताक अली ट्रॉफी (T20) 11 ऑक्टोबरपासून खेळली जाऊ शकते तर विजय हजारे ट्रॉफी (ODI फॉरमॅट) 12 नोव्हेंबरपासून अपेक्षित आहे. रणजी ट्रॉफी 13 डिसेंबरपासून सुरू होऊ शकते. 1 फेब्रुवारीपासून बाद फेरीचे सामने खेळवले जाणार आहेत. बैठकीत चर्चा झालेल्या एका स्वरूपानुसार रणजी ट्रॉफीमध्ये आठ एलिट संघांचे चार गट आणि सहा प्लेट संघांचा एक गट असू शकतो . गांगुली म्हणाले की, येत्या हंगामापासून महिलांच्या 16 वर्षांखालील गटाला सुरुवात होणार आहे.
