
आगामी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला मोजून काही दिवस बाकी आहेत. या स्पर्धेचा थरार हा फेब्रुवारी ते मार्च दरम्यान रंगणार आहे. स्पर्धेचं आयोजन हे भारत आणि श्रीलंकेतील एकूण 7 शहरांमधील 8 स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ एका ट्रॉफीसाठी भिडणार आहेत. स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांआधी वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. तर जानेवारीतील पहिल्या आठवड्यात वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. टीम इंडिया या स्पर्धेत वर्ल्ड कप राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. रोहित शर्मा याने त्याच्या नेतृत्वात भारताला 2024 मध्ये वर्ल्ड कप जिंकून दिला होता. तर आता कर्णधार सूर्यकुमार यादव याच्यासमोर हा वर्ल्ड कप कायम राखायचं आव्हान असणार आहे. अशात आता मोठी अपडेट समोर आली आहे.
यंदा या स्पर्धेसाठी पहिल्यांदाच इटलीने क्वालिफाय केलं आहे. त्यामुळे इटली या स्पर्धेत कशी कामगिरी करते? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे. मात्र त्याआधी इटलीच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे. इटली क्रिकेट बोर्डाने त्यांच्या कर्णधाराला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. बोर्डाने कर्णधार जो बर्न्स याला टीममधून आऊट केलं आहे. जो याने इटलीला वर्ल्ड कप स्पर्धेसाठी क्वालिफाय करण्यात प्रमुख भूमिका बजावली. मात्र आता जो वैश्विक स्पर्धेत खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. इटली क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती दिली आहे.
क्रिकेट बोर्डानुसार, करारासंदर्भातील मुद्द्यांमुळे बर्न्स याला वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. तसेच इटली क्रिकेट बोर्डाने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी नव्या कर्णधाराचं नावंही जाहीर केलं. वेन मॅडसन हा इटलीचं नेतृत्व करणार आहे.
जो बर्न्स याला टीममधून बाहेर का केलं? याबाबत इटली क्रिकेट बोर्डाने स्पष्टीकरण दिलं. जो याच्यासोबत फार चर्चा झाली. मात्र त्यातून काही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे जो बर्न्स याच्यासह करार झाला नाही. इटलीने युरोप टी 20 वर्ल्ड कप पात्रता फेरीतून या स्पर्धेचं तिकीट मिळवलं. जो याने या स्पर्धेत नेतृत्व केलं होतं.
जो बर्न्स याने इटलीचं 8 टी 20i सामन्यांमध्ये नेतृत्व केलं. जो याने या दरम्यान वर्ल्ड कप क्वालिफायर स्पर्धेत रोमानिया विरुद्ध नाबाद शतक झळकावलं होतं. जो च्या नेतृत्वात इटली ग्वेर्नसे आणि स्कॉटलँडवर मात करत टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत धडक दिली.