चॅम्पियन्स ट्रॉफीत फक्त एक कर्णधार कायम, सहा संघांनी टाकला दुसऱ्यांवर विश्वास, तर एक संघच बदलला!
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जवळपास आठ वर्षांनी होत आहे. गेल्या आठ वर्षात बरंच पाणी पुलाखालून गेलं आहे. संघांचं रुपडंही पालटलं आहे. या आठ वर्षात टीममध्ये बराच बदल झाला आहे. सध्या सहभागी असलेल्या आठपैकी सहा संघांचे कर्णधार तर एक संघच नव्याने उतरला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. पाकिस्तान गतविजेता म्हणजे आठ वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होत आहे. त्यात या स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण या स्पर्धेपूर्वीच बरीच उलथापालथ झाली. भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहे. ही स्पर्धा आता हायब्रिड मॉडेलवर होत आहे. पण चॅम्पियन्स ट्रॉफीची चर्चा मात्र 2017 चा संदर्भ देत होत आहे. कारण या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ भिडले होते. पण अंतिम फेरीत पाकिस्तानने भारताला 180 धावांनी पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं होतं. आता त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. भारताचा पाकिस्तानशी सामना 23 फेब्रुवारीला होणार आहे. जर हे दोन्ही संघ अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी झाले तर पुन्हा आमनेसामने येतील. असं असताना 2017 पासून आतापर्यंत संघात बरेच बदल झाले आहेत. एकूण सहा संघांचे कर्णधार बदलले आहेत. तर श्रीलंका पात्र न ठरल्याने अफगाणिस्तानला संधी मिळाली आहे. म्हणजेच एक संघ बदलला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते. तेव्हा इंग्लंड, बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड एका गटात होते. तर भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि दक्षिण अफ्रिका एका गटात होते. अ गटातून उपांत्य फेरीत इंग्लंड आणि बांग्लादेश, तर ब गटातून भारत आणि पाकिस्तान पोहोचले होते. या स्पर्धेत भारताचं नेतृत्व विराट कोहली, पाकिस्तानचं नेतृत्व सरफराज अहमद, बांगलादेशचं नेतृत्व मशरफे बिन मोर्ताझा, इंग्लंडचं नेतृत्व इऑन मॉर्गन, ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व स्टीव्ह स्मिथ, न्यूझीलंडचं नेतृत्व केन विल्यमसन, श्रीलंकेचं नेतृत्व अँजेलो मॅथ्यूज, दक्षिण अफ्रिकेचं नेतृत्व एबी डिव्हिलियर्सकडे होतं. आता यापैकी फक्त ऑस्ट्रेलियाची धुरा स्टीव्ह स्मिथकडे असून इतर कर्णधार बदलले आहेत. पॅट कमिन्स दुखापतग्रस्त असल्याने त्याच्याकडे पुन्हा एकदा धुरा आली आहे.
भारताचं नेतृत्व विराट कोहलीकडून रोहित शर्माकडे, पाकिस्तानचं नेतृत्व सरफराज अहमदकडून मोहम्मद रिझवान, न्यूझीलंडचं नेतृत्व केन विल्यमसनकडून मिचेल सँटनरकडे, बांगलादेशचं नेतृत्व मोर्ताझाकडून नजमुल होसेन शांतोकडे, दक्षिण अफ्रिकेचं नेतृत्व एबी डिव्हिलियर्सकडून टेम्बा बावुमाकडे, इंग्लंडचं नेतृत्व इऑन मॉर्गनकडून जोस बटलरकडे आलं आहे. तर श्रीलंकेचा संघ या स्पर्धेत पात्र ठरला नसून त्या ऐवजी अफगाणिस्तानला संधी मिळाली आहे.
