Captain : सीएसकेने ऋतुराज गायकवाडलाच का कॅप्टन बनवलं? जाणून घ्या सविस्तर
CSK New Captain : मराठामोळा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड आता सीएसके संघाचं कर्णधारपद सांभाळताना दिसणार आहे. धोनीचा उत्तराधिकारी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतंच. पण त्यासोबतच आणखी अशी काही कारणे आहेत ज्यामुुळे टीम मॅनेजमेंटने त्याच्याकडे संघाचं कर्णधारपद देण्याचा निर्णय घेतला.

मुंबई : IPL 2024 स्पर्धेला सुरूवात होण्यासाठी अवघे काही तास बाकी आहेत. अशातच सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. यंदाच्या सीझनमध्ये महेंद्र सिंंह धोनी आता सीएसके संघाचा कर्णधार नसणार आहे. सीएसके संघाने कर्णधारपदाची जबाबदारी महाराष्ट्राचा वाघ ऋतुराज गायकवाड याच्याकडे दिली आहे. चार मार्चला धोनीने पोस्ट करत नवीन भूमिकेत दिसणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र कोणालाच वाटलं नव्हतं की सीएसके मॅनेजमेंट कॅप्टन बदलण्याच्या तयारीत आहे. सीएसकेने ऋतुराज गायकवाड याच्याकडे कॅप्टन्सी देण्याचा निर्णय का घेतला याबाबत सविस्तर जाणून घ्या.
सीएसकेने ऋतुराजलाच का कॅप्टन बनवलं?
सीएसकेने संघाची कॅप्टन्सी 2022 मध्ये रवींद्र जडेजा याच्याकडे देण्यात आली होती. जडेजाने 8 सामन्यांमध्ये नेतृत्त्व केलं मात्र अवघ्या आठ सामन्यानंतर परत एकदा धोनीकडे कर्णधारपद देण्यात आलं होतं. त्यानंतर परत एकदा धोनीनंतर त्याचा उत्तराधिकारी कोण? असा सवाल उपस्थित झालेला. तेव्हा ऋतुराज गायकवाड हा एकमेव पर्याय सीएसके टीम मॅनेजमेंटला दिसला. सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे धोनीचा जवळचा मानला जातो. आपल्या फलंदाजीतही ऋतुराजने सातत्य ठेवल्याचं पाहायला मिळालं.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये ऋतुराजकडे महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. त्यासोबतच आशियाई क्रीडा स्पर्धेत टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्याकडे देण्यात आली होती. आशियाई स्पर्धेमध्ये भारताने सुवर्णपदक जिंकलं होतं, ऋतुराज या परीक्षेत पास झाला होता. ऋतुराज याच्यासाठी या जमेच्या बाजू ठरल्याच पण त्यासोबतच युवा खेळाडू म्हणूनही भविष्याचा विचार करत मॅनेजमेंटने कर्णधारपदाची माळ त्याच्या गळ्यात घालण्याचं ठरवलं असावं.
OFFICIAL STATEMENT: MS Dhoni hands over captaincy to Ruturaj Gaikwad. #WhistlePodu #Yellove
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 21, 2024
ऋतुराज याची आयपीएलमधील कामगिरी
ऋतुराज गायकवाड याने आतापर्यंत 52 सामने खेळले असून 135.52 च्या स्ट्राइक रेटने 1797 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 14 अर्धशतकांचा समावेश असणार आहे. 2021 साली सीएसकेने विजेतेपद जिंकलेलं तेव्हा ऑरेंज कॅपचा विजेते ऋतुराज गायकवाड ठरला होता. 2021 साली त्याने 16 सामन्यांमध्ये 45.35 च्या सरासरीने 635 धावा केल्या होत्या.
चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल फायनल संंघ 2024 :- ऋतुराज गायकवाड (C) एमएस धोनी, मोईन अली, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथीशा पाथीराना, अजिंक्य रहाणे, शेख रशीद सिंग, मिचेल सिंग, शेख रशीद. , निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, महेश थेक्षाना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, अवनीश राव अरावेली.
