
दुलीप ट्रॉफी स्पर्धेत 21 वर्षीय दानिश मालेवरने जबरदस्त खेळी केली. त्याच्या या खेळीची क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे. दुलीप ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या दुसर्या उपांत्यपूर्व फेरीत सेंट्रल झोन आणि नॉर्थ ईस्ट झोन हे संघ आमनेसामने आले आहेत. यात सेंट्रल झोनच्या दानिश मालेवरने नॉर्थ ईस्ट झोनच्या गोलंदाजांची धुलाई केली. या सामन्यात दानिश मालेवर द्विशतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. दानिश मालेवरने 218 चेंडूचा सामना 35 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 198 धावा केल्या आहेत. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 90.83 चा आहे. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात त्याचं द्विशतक पूर्ण होईल असंच वाटत आहे. दानिश मालेवरने या खेळीत 35 चौकार आणि 1 षटकार मारला. म्हणजेच 146 धावा फक्त चौकार आणि षटकारानेच पूर्ण केल्या आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सेंट्रल झोनने 77 षटकात 2 गडी गमवून 432 धावा केल्या. त्यामुळे नॉर्थ ईस्टच झोनवर पहिल्याच दिवशी दबाव वाढला आहे. पण हा दानिश मालेवर आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत…
दानिश मालेवरचा जन्म नागपूरमध्ये 8 ऑक्टोबर 2003 रोजी झाला. तो विदर्भ संघासाठी खेळतो आणि फर्स्ट क्लास डेब्यू त्याने आंध्र प्रदेशविरुद्ध नागपूरमध्ये केलं. त्याने दुसऱ्या डावात तिसऱ्या क्रमांकावर खेळताना 61 धावा केल्या. तसेच पुढच्या तीन डावात दोन अर्धशतकं ठोकली. तसेच फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये गुजरातविरुद्ध नागपूरमध्येच पहिलं शतक ठोकलं होतं. रणजी स्पर्धेत दानिश 9 सामन्यातील 15 डावात 52.20 च्या सरासरीने आणि 51.34 च्या स्ट्राईक रेटने 783 दावा केल्या होत्या. यावेळी त्याने 95 चौकार आणि 6 षटकार मारले. यात दोन शतकं आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा हा फॉर्म दुलीप ट्रॉफी स्पर्धेतही कायम आहे. आता द्वीशतक ठोकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ही कामगिरी करू शकतो.
दानिशने आतापर्यंत एकही लिस्ट ए किंवा टी20 सामना खेळलेला नाही. पण या फॉर्मेटमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहे. त्याची फलंदाजी पाहता लवकरच या फॉर्मेटमध्ये खेळताना दिसू शकतो. दरम्यान, दानिशच्या वडिलांनी त्याच्या जन्मापूर्वी क्रिकेट करिअर ठरवून टाकलं होतं. कारण दानिशचे वडील क्रिकेटचे चाहते आहेत. त्यांनी लग्नापूर्वीच ठरवलं होतं की मुलगा झाला तर त्याला क्रिकेटपटू बनवणार. आता दानिश त्यांचं स्वप्न पूर्ण करेल असंच दिसत आहे.