चार वेळा शून्यावर बाद होऊनही सैम अयूब नंबर 1, हार्दिक पांड्याला बसला फटका; जाणून घ्या काय झालं
पाकिस्तानच्या सैम अयुबने आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक अंडी फोडली. एक दोन नाही तर तब्बल चार वेळा शून्यावर बाद झाला. असं असूनही सैम अयुबला नंबर 1 मान मिळाला आहे. हे कसं शक्य झालं ते जाणून घ्या.

आशिया कप स्पर्धा पार पडल्यानंतर आयसीसीने टी20 क्रिकेटची नवी क्रमवारी जाहीर केली आहे. ही क्रमवारी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण आशिया कप स्पर्धेत पूर्णपणे फेल गेलेल्या सैम अयुबला प्रथम क्रमांकाचा मान मिळाला आहे. तर हार्दिक पांड्याला मोठा धक्का बसला आहे. कारण त्याने पहिलं स्थान गमावलं आहे. सैम अयुब हा पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू आहे. या स्पर्धेतील सात पैकी 4 सामन्यात त्याला खातंही खोलता आलं नाही. सैम अयुबने या स्पर्धेत फक्त 37 धावा केल्या. त्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. पण गोलंदाजीत चागंली कामगिरी केल्याने त्याला आयसीसीच्या टी20 अष्टपैलू यादीत पहिलं स्थान मिळालं आहे. त्याने हार्दिक पांड्याला मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं आहे. आयसीसीने बुधवार 1 ऑक्टोबर रोजी नवीन क्रमवारी जाहीर केली.
पाकिस्तानचा सैम अयुब आता टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नंबर एक अष्टपैलू खेळाडू बनला आहे. सैम अयुबने ही कामगिरी पहिल्यांदाच केली आहे. सैम अयुबने चार स्थानांची झेप घेत अव्वल स्थान गाठले आहे. अयुबचे 241 रेटिंग गुण आहेत. तर हार्दिक पंड्याचे रेटिंग 233 असून अयुब 8 गुणांनी त्याच्या पुढे आहे. हार्दिक पांड्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळला नाही. त्यामुळे त्याला फटका बसला आहे. सैम अयुबने सात सामन्यात एकूण 8 विकेट घेतल्या. त्याचा इकोनॉमी रेट हा 6.40 होता. त्याला गोलंदाजीमुळे फायदा झाला. तसेच आशिया कप स्पर्धेतील तिसरा यशस्वी गोलंदाज आहे.
हार्दिक पांड्या रेटिंग गुण 233 सह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी 231 रेटिंग गुणांसह तिसऱ्या आणि नेपाळचा दीपेंद्र सिंग 214 रेटिंग गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. झिम्बाब्वेचा सिकंदर रझा 201 रेटिंग गुणांसह पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलनेही आयसीसी टी20 अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत झेप घेतली आहे. अक्षर पटेल 175 रेटिंग गुणांसह एका स्थानाने पुढे पाऊल टाकत दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे, भारताचा स्टार फलंदाज अभिषेक शर्माने 926 रेटिंग गुणांसह फलंदाजांच्या यादीत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
