ENG vs IND : टीम इंडियाकडून वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी, शुबमसेनेची ऐतिहासिक कामगिरी, नक्की काय?

England vs India Test Series : भारतीय कसोटी संघाने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील पाचही सामन्यात एकूण 12 शतकं झळकावली. यासह भारतीय संघाने विश्व विक्रमाची बरोबरी केली.

ENG vs IND : टीम इंडियाकडून वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी, शुबमसेनेची ऐतिहासिक कामगिरी, नक्की काय?
Indian Cricket Team National Anthem
Image Credit source: Bcci
| Updated on: Aug 03, 2025 | 6:28 PM

टीम इंडिया इंग्लंडमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. टीम इंडिया या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. भारतासमोर लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे खेळवण्यात येत असलेला पाचवा आणि अंतिम सामना जिंकून मालिकेत 2-2 ने बरोबरी करण्याचं आव्हान आहे. या मालिकेत भारतीय संघाने बॅटिंगने अफलातून कामगिरी केली. भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करत खोऱ्याने धावा केल्या. भारताने यासह एका वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

भारतीय संघातील अनेक फलंदाजांनी इंग्लंड दौऱ्यात अप्रतिम कामगिरी केली. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर भारताचं इग्लंड दौऱ्यात काय होईल आणि कसं होईल? अशी भीती क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र भारतीय फलंदाजांनी आतापर्यंत या मालिकेत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करुन चाहत्यांची भीती खोटी ठरवली.

भारताच्या फलंदाजांनी या मालिकेतील 5 सामन्यांमध्ये एकूण 12 शतकं झळकावली. भारताने यासह एका कसोटी मालिकेत सर्वाधिक शतकांच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली आहे. भारतीय संघाआधी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 3 संघांनी एका मालिकेत प्रत्येकी 12 शतकं लगावली होती.

एका मालिकेत 12 शतकं

आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या 3 संघांनी एकाच मालिकेत प्रत्येकी 12 शतकं लगावली होती. ऑस्ट्रेलियाने 1955 साली वेस्ट इंडिज विरुद्ध, पाकिस्तानने 1982-83 मध्ये भारताविरुद्ध तर दक्षिण आफ्रिकेने 2003-2004 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध अशी कामगिरी केली होती. त्यानंतर आता 22 वर्षांनी भारतीय संघाने 12 शतकांचा पाऊस पाडला.

कर्णधार शुबमनकडून सर्वाधिक शतकं

भारतीय संघासाठी इंग्लंड विरूद्धच्या सुरु असलेल्या या मालिकेत एकूण 6 फलंदाजांनी शतकं लगावली. यामध्ये कर्णधार शुबमन गिल, उपकर्णधार ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंनी शतक ठोकलं. या मालिकेत सर्वाधिक 4 शतकं ही शुबमन गिल याने ठोकली. तर ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल या तिघांनी प्रत्येकी 2-2 शतकं पूर्ण केली. तर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या ऑलराउंडर जोडीने शतक करुन चौथा सामना हा बरोबरीत राखण्यात निर्णायक भूमिका बजावली होती.

इंग्लंडला जशास तसं उत्तर

शुबमन, केएल, यशस्वी, ऋषभ, जडेजा आणि वॉशिंग्टन या फलंदाजांनी निर्णायक क्षणी शतक करुन इंग्लंडला जशास तस उत्तर दिलं आणि भारताला सामन्यात कायम ठेवण्यात निर्णायक भूमिका बजावली. याच कामगिरीमुळे भारताने दुसऱ्या सामन्यात 336 धावांच्या ऐतिहासिक फरकाने विजय मिळवला. तर तिसऱ्या सामन्यात अवघ्या 22 धावांनी पराभूत व्हावं लागलं. तर चौथ्या सामन्यात जडेजा आणि सुंदर जोडीने शतकी खेळी करुन इंग्लंडच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावला आणि सामना बरोबरीत राखला.