ENG vs IND : दुसर्या टेस्टसाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर, चौघांना डच्चू, टीम मॅनेजमेंटचा मोठा निर्णय
England vs India 2nd Test Playing 11 : क्रिकेट बोर्डाने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या 48 तासांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर करत आपण सज्ज असल्याचं जाहीर केलं आहे. तर 4 खेळाडूंना डच्चू मिळाला आहे. जाणून घ्या.

भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली. इंग्लंडने सलामीचा सामना हा 5 विकेट्सने जिंकत मालिकेत 1-0 आघाडी घेतली. त्यानतंर आता उभयसंघातील दुसरा कसोटी सामना हा 2 जुलैपासून बर्मिंगहॅममधील ऐतिहासिक एजबेस्टन मैदानात खेळवण्यात येणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने टीम इंडिया विरूद्धच्या या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी 2 दिवसांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. इंग्लंड क्रिकेट टीमने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
इंग्लंडने काही दिवसांपूर्वी 26 जून रोजी दुसर्या सामन्यासाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला होता. इंग्लंडने दुसऱ्या सामन्यासाठी 15 सदस्यीय संघात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याचा समावेश केला होता. 15 खेळाडूंचा संघ जाहीर केल्याने प्लेइंग ईलेव्हन जाहीर होताच चौघांचा पत्ता कट होणार हे निश्चित होतं. मात्र ते 4 खेळाडू कोण असणार? हे निश्चित नव्हतं. मात्र आता डच्चू मिळालेले 4 खेळाडू कोण? हे स्पष्ट झालं आहे.
इंग्लंड टीम अनचेंज
जोफ्रा आर्चर याचा समावेश केला गेल्याने त्याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळेल, हे निश्चित समजलं जात होतं. मात्र तसं होऊ शकलेलं नाही. इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. टीम मॅनेजमेंटने पहिल्या कसोटी सामन्यातील त्याच 11 खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे.
जोफ्रा आर्चर याला वैयक्तिक कारणामुळे संघासह सहभागी होता आलं नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे जोफ्रा आर्चर, जॅकब बॅथेल, सॅम कुक आणि जेमी ओव्हरटन या चौघांना प्लेइंग ईलेव्हनमध्ये खेळता येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
आता टीम इंडियाकडे लक्ष
दरम्यान इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हन जाहीर करत दुसऱ्या सामन्यासाठी रणशिंग फुकलं आहे. तर दुसऱ्या बाजूला आता बीसीसीआय टीम मॅनेजमेंट पहिल्या पराभवानंतर प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी देणार आणि कुणाचा पत्ता कट करणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे.
इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन फिक्स
England name an unchanged side to take on India in the second Test at Edgbaston 🚨🏴 pic.twitter.com/6CXru6b7Pe
— Sky Sports Cricket (@SkyCricket) June 30, 2025
टीम इंडिया विरूद्धच्या दुसऱ्या टेस्टसाठी इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन : झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग आणि शोएब बशीर.
