ENG vs IND : बेन स्टोक्स-जो रुटची शतकी खेळी, इंग्लंडच्या पहिल्या डावात 669 धावा, टीम इंडिया विरुद्ध 311 ची आघाडी

England vs India 4th Test : इंग्लंड क्रिकेट टीमने पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारत चौथ्या कसोटीवरील विजयाचा दावा मजबूत केला आहे. इंग्लंडने टीम इंडियाच्या 358 च्या प्रत्युत्तरात 669 धावांचा डोंगर उभारला आहे.

ENG vs IND : बेन स्टोक्स-जो रुटची शतकी खेळी, इंग्लंडच्या पहिल्या डावात 669 धावा, टीम इंडिया विरुद्ध 311 ची आघाडी
Joe Root and Ben Stokes
Image Credit source: Icc X account
| Updated on: Jul 26, 2025 | 6:14 PM

कर्णधार बेन स्टोक्स आणि अनुभवी फलंदाज जो रुट या अनुभवी जोडीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने टीम इंडिया विरुद्ध चौथ्या कसोटीतील चौथ्या दिवशी पहिल्या डावात सर्वबाद 669 धावा केल्या. इंग्लंडची कसोटी क्रिकेटमधील टीम इंडिया विरुद्ध ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. इंग्लंडने यासह टीम इंडिया विरुद्ध पहिल्या डावात 311 धावांची आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 358 धावा केल्या होत्या. इंग्लंडने प्रत्युत्तरात अप्रतिम कामगिरी करत 650 पार मजल मारली आणि सामन्यावर घट्ट पकड मिळवली. त्यामुळे आता टीम इंडिया दुसऱ्या डावात 311 धावांची आघाडी मोडीत काढण्यात यशस्वी ठरणार की इंग्लंड डावाने सामना जिंकणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

साई सुदर्शन, यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत या तिघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने सर्वबाद 358 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने कडक सुरुवात केली. बेन डकेट आणि झॅक क्रॉली सलामी जोडीने 166 धावांची भागीदारी केली. मात्र सलामी जोडीला शतक करता आलं नाही. क्रॉलीने 113 चेंडूत 84 धावा केल्या. तर डेब्यूटंटं अंशुल कंबोज याने बेन डकेटला 94 धावांवर बाद केल.

त्यानंतर ओली पोप आणि जो रुट या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 144 रन्स जोडल्या. ओली पोपने 71 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. हॅरी ब्रूकला 3 धावांवर आऊट करत टीम इंडियाने इंग्लंडला चौथा झटका दिला. त्यामुळे इंग्लंडचा स्कोअर 4 आऊट 349 असा झाला.

इंग्लंडकडे 311 धावांची मोठी आघाडी

त्यानंतर इंग्लंडने पाचव्या विकेटसाठी 150 धावांची भागीदारी केली. इंग्लंडने जो रुटच्या रुपात पाचवी विकेट गमावली. जो रुट याने इंग्लंडसाठी सर्वाधिक 150 धावांचं योगदान दिलं. जसप्रीत बुमराह याने जेमी स्मिथ याला 9 धावांवर मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. ख्रिस वोक्सने 4 धावा केल्या. लियाम डॉसन याने 26 धावांचं योगदान दिलं. कर्णधार बेन स्टोक्स याने 198 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 11 फोरसह 141 रन्स केल्या. तर ब्रायडन कार्स आऊट होताच इंग्लंडचा पहिला डाव 157.1 षटकांमध्ये 669 धावांवर आटोपला.

टीम इंडियासाठी रवींद्र जडेजा याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर अंशुल कंबोज आणि मोहम्मद सिराज या जोडीने 1-1 विकेट घेतली.