ENG vs IND : टीम इंडियाला विजयासाठी 3 विकेट्सची गरज, इंग्लंडला पाचव्या दिवशी 35 धावा करण्यापासून रोखणार?
England vs India 5th Test Day 4 Stumps Highlights In Marathi : इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. मात्र पावसामुळे आणि खराब प्रकाशामुळे चौथ्या दिवसाचा खेळ वेळेआधी थांबवण्यात आला.

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ वेळेआधीच संपवण्यात आला आहे. खराब प्रकाश आणि पावसामुळे हा निर्णय घेण्यात आला. हॅरी ब्रूक आणि जो रुट या जोडीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने केनिंग्टन ओव्हलमध्ये 374 धावांचा पाठलाग करताना खराब प्रकाशामुळे खेळ थांबवण्याआधी 76.2 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 339 धावा केल्या. त्यामुळे आता इंग्लंडला सामन्यासह मालिका विजयासाठी पाचव्या दिवशी आणखी 35 धावा कराव्या लागणार आहेत. तर भारताला विजयासह मालिकेत बरोबरीसाठी 3 विकेट्सची गरज आहे. ख्रिस वोक्स याला पाचव्या सामन्यात दुखापत झाली. त्यामुळे वोक्सला उर्वरित सामन्यातून बाहेर व्हावं लागलंय. त्यामुळे इंग्लंड या सामन्यात 10 फलंदाजांसह खेळत आहे.
चौथ्या दिवशी काय घडलं?
मोहम्मद सिराज याने इंग्लंडला तिसर्या दिवसातील शेवटच्या चेंडूवर बाद करत इंग्लंडला दुसर्या डावात पहिला झटका दिला. सिराजने झॅक क्रॉली याला 14 धावांवर बोल्ड केलं. यासह तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. इंग्लंडसाठी नाबाद राहिलेल्या बेन डकेट आणि कर्णधार ओली पोप या जोडीने 13.5 ओव्हरपासून 1 बाद 50 पासून चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली.
या जोडीने सुरुवातीच्या काही षटकात संयमाने धावा केल्या. मात्र प्रसिध कृष्णा याने ही जोडी फोडली आणि चौथ्या दिवशी पहिली विकेट मिळवून दिली. प्रसिधने बेन डकेट याला 54 धावांवर केएल राहुल याच्या हाती कॅच आऊट केलं. त्यानंतर मोहम्मद सिराजने ओली पोपला 27 रन्सवर एलबीडब्ल्यू करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे इंग्लंडची 3 आऊट 106 अशी स्थिती झाली. त्यामुळे इंग्लंड बॅकफुटवर गेली.
पोपनंतर हॅरी ब्रूक आणि जो रुट या जोडीसमोर भारतीय गोलंदाजांसमोर टिकून खेळण्याचं आव्हान होतं. तर भारतीय संघ आणखी एक विकेट मिळवून इंग्लंडला आणखी मागे टाकण्यासाठी प्रयत्नशील होती. या जोडीने एकेरी-दुहेरी धावा जोडत इंग्लंडला सावरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा 35 व्या षटकात हॅरीने प्रसिधच्या बॉलिंगवर मोठा फटका मारला. सिराजने बाउंड्री लाईनवर कॅच पकडला. त्यामुळे भारतीय खेळाडूंसह चाहते आनंदी झाले. मात्र सिराजचा कॅच घेताच पाय बाऊंड्री लाईनला लागला. त्यामुळे हॅरीला 19 धावांवर जीवनदान मिळालं. सोबतच 6 धावाही मिळाल्या.
सिराजने सोडलेली कॅच भारताला 92 धावांनी महागात पडली. ब्रूक 111 धावांवर आऊट झाला. यासह रुट-ब्रूक जोडीने चौथ्या विकेटसाठी केलेल्या 195 धावांच्या भागीदारीला पूर्णविराम लागला. मात्र तोवर इंग्लंड चांगल्या स्थितीत पोहचली आणि भारत पराभवाच्या छायेत होता.
टीम इंडियाचं जोरदार कमबॅक
ब्रूक आऊट झाल्याने इंग्लंडला आता फक्त 73 धावाच पाहिजे होत्या. त्यामुळे इंग्लंड जिंकणार असं चित्र होतं. त्यात जो रुट खेळत होताच. रुट आणि जेकब बेथेल या जोडीने पाचव्या विकेटसाठी 31 धावा जोडल्या. त्यानंतर प्रसिधने बेथलला 5 धावांवर बोल्ड करत रोखलं आणि इंग्लंडला 332 धावांवर पाचवा झटका दिला. त्यानंतर प्रसिधने 5 धावा दिल्यानंतर जो रुट याचा काटा काढला. इंग्लंडने रुटच्या रुपात सहावी विकेट गमावली. प्रसिधने 105 धावा केल्या. टीम इंडियाने यासह सामन्यात कमबॅक केलं. एकाएकी सामना रंगतदार झाला.
..आणि इंग्लंडच्या गोटात भीती
भारतीय चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला. भारतीय गोलंदाजांनाही हुरुप आला. सिराज आकाश आणि प्रसिधही जोडी धारदार बॉलिंग करत अपिल करत होते. मात्र भारताला विकेट मिळाली नाही. मात्र इंग्लंडच्या गोटात भीतीचं वातावरण पाहायला मिळत होतं. भारतीय गोलंदाज सातव्या विकेटच्या प्रतिक्षेत होते. मात्र खराब प्रकाशामुळे इंग्लंडच्या 76.2 ओव्हरमध्ये 6 बाद 339 रन्स असताना खेळ थांबवण्यात आला. जेमी स्मिथ 2 आणि जेमी ओव्हरटन 0 वर नॉट आऊट परतले. त्यानंतर पावसाने बॅटिंग सुरु केली. त्यामुळे अखेर चौथ्या दिवसाचा खेळ संपल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे आता पाचव्या दिवशी विजयासाठी 35 धावा आणि 3 विकेट्स अशी लढाई पाहायला मिळणार आहे.
