
इंग्लंडच्या माजी नंबर 1 टी20 फलंदाज डेविड मलानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मलानने 2023 मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकपनंतर एकही सामना खेळलेला नाही. 37 वर्षीय मलानने इंग्लंडसाठी 22 कसोटी, 30 वनडे आणि 62 टी20 सामने खेळले आहेत. नुकतंच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादीत षटकांच्या मालिकेसाठी संघासाठी घोषणा केली होती. मात्र या संघात त्याला स्थान मिळालं नाही. त्यानंतर मलानने निवृत्ती जाहीर केली आहे. मलानने क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये शतकी खेळी करत इंग्लंड संघात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. जोस बटलरसोबत एकाच पंगतीत बसला आहे. इतकंच काय तर सप्टेंबर 2020 मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचला होता. टी20 वर्ल्डकप जिंकवणाऱ्या संघातही सामील होता. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात कमरेला झालेल्या दुखापतीमुळे मलान मात्र बाद फेरीला मुकला होता.
मलानने द टाइम्सशी बोलताना सांगितलं की, ‘मी व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये माझ्या अपेक्षांच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. पण कसोटीत चांगली कामगिरी न केल्याची खंत राहील.’ मलानने 22 कसोटी पैकी 10 कसोटी ऑस्ट्रेलियात खेळल्या. कसोटीच्या 39 डावात एक शतक आणि 9 अर्धशतकं ठोकली. ‘कसोटी क्रिकेट माझ्यासाठी सर्वोच्च राहिलं आहे. मी दरम्यान चांगला खेळ केला. पण चांगली कामगिरी करण्यात अपयश आलं. तसेच सातत्य नव्हतं, हे निराशाजनक आहे. मला वाटते की मी यापेक्षा चांगला खेळाडू आहे. मी तिन्ही फॉर्मेट खूप गांभीर्याने घेतले. पण कसोटी क्रिकेट काही वेगळं ठरलं.’, असंही मलान पुढे म्हणाला.
इंग्लंड संघाची साथ सोडल्यानंतर डेविड मलान आता टी20 फ्रेंचायसी क्रिकेट खेळताना दिसू शकतो. सध्या द हंड्रेड लीग खेळत आहे. डेविड मलानने 22 कसोटीत 1074 धावा आणि 2 विकेटच घेतल्या आहेत. 30 वनडे सामन्यात 1450 धावा आणि 1 विकेट घेतली आहे. तर 62 टी20 सामन्यात 1892 धावा आणि 1 विकेट घेतली आहे. डावखुरा मलान आयपीएलमध्येही खेळला आहे. 2021 मध्ये पंजाब किंग्सने त्याला 1.5 कोटी रुपये देत संघात घेतलं होतं. पण फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. त्यात त्याने 26 धावा केल्या.