क्रिकेटमध्ये या तीन खेळाडूंनी मिळवला नावलौकिक, आता सेल्समन-लॉरी ड्रायव्हर म्हणून करताहेत कामं
क्रिकेटमध्ये वारेमाप पैसा आहे अशी समज आहे. भारतात एकदा क्रिकेटमध्ये नावलौकीक मिळाला की सांगायलाच नको. क्रिकेट कारकिर्दित खेळाडू रंकाचा राजा होतो. पण काही खेळाडूंच्या बाबतीत हेच चित्र वेगळं आहे. राजाचा रंक झाला असून सेल्समनपासून लॉरी चालवण्याची वेळ आली आहे.

जगभरात क्रिकेटचे अनेक चाहते आहेत. भारतात तर क्रिकेटपटूंना देव मानलं जातं. त्यामुळे क्रिकेटची किती क्रेझ आहे ते दिसून येतं. क्रिकेटमुळे अनेक खेळाडूंना नावलौकिक मिळाला आहे. तसेचआर्थिक गणितं झपाट्याने बदलली आहेत. ज्या खेळाडूंनी आपलं बालपण गरिबीत घालवलं असा खेळाडूंची आर्थिक चणचण कायमची दूर झाली आहे. त्यामुळे आयुष्यात मागे वळून पाहण्याची वेळ आली नाही. असे बरेच क्रिकेटपटू आहेत. पण काही क्रिकेटपटू निवृत्तीनंतर हालाखीचं जीवन जगत आहेत. जर तुम्हाला सांगितलं तर पटणार नाही, पण ही गोष्ट खरी आहे. ज्या क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकीक मिळवला त्या खेळाडूंवर निवृत्तीनंतर कामं करून जगण्याची वेळ आली आहे. यात पहिलं नाव आहे न्यूझीलंडच्या सलामीवीर मॅथ्यू सिंक्लेअरचं..
मॅथ्यू सिंक्लेअरचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला. पण न्यूझीलंडकडून खेळला. मॅथ्यूने पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावलं होतं. त्याने 2013 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण त्याची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. सध्या घरखर्च भागवण्यासाठी नेपियरमध्ये सेल्समन म्हणून काम करत आहे. मॅथ्यू सध्या 48 वर्षांचा असून 33 कसोटी, 54 वनडे आणि 2 टी20 सामने खेळला आहे. कसोटीत 3 शतकं ठोकली आहेत. यात दोन द्विशतकांचा समावेश आहे. तर वनडेत 2 शतकं नावावर आहेत.
न्यूझीलंडचा ख्रिस क्रेनची काय वेगळी स्थिती नाही. त्याने न्यूझीलंडला अनेक सामन्यात विजय मिळवून दिला. पण कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी लॉरी चालक म्हणून काम करतो. ख्रिस क्रेनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर हिऱ्यांचा व्यवसाय सुरु केला होता. यात त्याचे प्रचंड नुकसान झाले. त्यात आजारपणामुळे हिऱ्यांचा व्यापार बंद पडला. ख्रिस क्रेन आता 54 वर्षांचा आहे. कसोटी 5 शतकं, वनडे 4 शतकं ठोकली आहेत. कसोटीत 218 विकेट आणि वनडेत 201 विकेट घेतल्या आहेत. त्याने 2004 साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
पाकिस्तानच्या अर्शद खानची स्थितीही वाईट आहे. अर्शद खानचा फिरकीपटू म्हणून नावलौकीक होता. अनेक वर्षे पाकिस्तान संघात खेळला. 1993 साली संघात एन्ट्री घेतली आणि 2006 साली क्रिकेटमधून निवृत्त झाला. पण आर्थिक स्थिती खालावल्याने हाती पडेल ते काम करावं लागत आहे. ऑस्ट्रेलियात अर्शद खान टॅक्सी चालवतो. अर्शद खान आता 53 वर्षांचा आहे. 9 कसोटीत 32 विकेट आणि 58 वनडे सामन्यात 56 विकेट घेतल्या आहेत.
