आयपीएल 2026 स्पर्धेतही पाच विक्रम राहिले अबाधित, कोणते ते जाणून घ्या
आयपीएल स्पर्धेचं 19वं पर्व संपलं आहे. आता दहा महिन्यांना 20वं पर्व असणार आहे. आतापर्यंत या स्पर्धेत काही विक्रम मोडले गेले, तर काही विक्रम अबाधित राहिले आहेत. चला जाणून घेऊयात पाच विक्रमांबाबत ते मोडणं अद्याप कठीण आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आले होते, या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला नमवलं आणि जेतेपदाला गवसणी घातली. सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याची किमया केली. या स्पर्धेतील 74 सामन्यात काही विक्रम मोडले आणि नव्याने रचले गेले. पण गेल्या काही वर्षात काही विक्रम मोडणं कठीण झालं आहे. काही विक्रमांच्या आसपास पोहोचणं देखील कठीण झालं आहे. आयपीएल असेच पाच विक्रम 19 व्या पर्वानंतरही अबाधित आहेत. चला जाणून घेऊयात त्याबाबात
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम या पर्वातही अबाधित राहिला. हा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 2013 मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 66 चेंडूत 175 धावा केल्या होत्या. ही आयपीएलमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. आतापर्यंत हा विक्रम कोणलाच मोडता आलेला नाही. गेली 14 वर्षे हा विक्रम कायम आहे. या विक्रमाच्या जवळ दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर केएल राहुल पोहोचेल असं वाटलं होतं. पण तोही 152 धावांपर्यंत मजल मारू शकला.
आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतकाचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 30 चेंडूत शतक पूर्ण केलं होतं. यंदाच्या पर्वात हा विक्रम मोडला जातो की काय अशी स्थिती होती. राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीकडे ही संधी होती. त्याने 28 चेंडूत 97 धावा केल्या होत्या. 29 व्या चेंडूवर त्याने चांगला फटका मारला होता. पण झेल बाद झाला. जर या चेंडूवर चौकार गेला असता तर ख्रिस गेलचा विक्रम मोडीत निघाला असता. पण तसं झालं नाही. वैभव सूर्यवंशी 29 चेंडूत 97 धावा करून बाद झाला.
आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम विराट कोहली आणि जोस बटलरच्या नावावर आहे. विराट कोहलीने 2016 मध्ये 4 शतकं झळकावली होती. तर बटलरने 2022 मध्ये चार शतकं झळकावत या विक्रमाची बरोबरी केली होती. मात्र हा विक्रम काही कोणी मोडू शकलं नाही. हा विक्रम मोडायचा तर एका पर्वात पाच शतकं झळकावी लागू शकतात.
आयपीएल स्पर्धेतील एकाच पर्वात सर्वाधिक धावांचा विक्रम अद्यापही कायम आहे. 2016 मध्ये विराट कोहलीने हा विक्रम रचला होता. त्याने 973 धावा केल्या होत्या. या पर्वातही हा विक्रम कायम राहिला. खुद्द विराट कोहलीही या विक्रमाची पुनरावृत्ती करू शकला नाही. इतकंच काय तर फॉर्मात असलेले वैभव सूर्यवंशी, शुबमन गिल आणि साई सुदर्शनही हा विक्रम मोडू शकले नाहीत.
आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम हर्षल पटेल आणि ड्वेन ब्राव्हो यंच्या नावावर आहे. ड्वेन ब्राव्होने 2013 मध्ये 32 बळी घेतले होते. तर 2021 मध्ये हर्षल पटेलने 32 विकेट घेत या विक्रमाची बरोबरी केली होती. पण विक्रम काही मोडू शकला नव्हता. त्यामुळे हा विक्रमही या पर्वात कायम राहिला आहे.