IND vs SA : गौतम गंभीर…, गुवाहाटीतील पराभवानंतर भारताच्या माजी कर्णधाराने काय म्हटलं?

Sunil Gavaskar On Gautam Gambhir : गुवाहाटीत भारताने सामन्यासह मालिकाही गमावली. दक्षिण आफ्रिकेने भारताला 2-0 ने व्हाईटवॉश केलं. भारताच्या या लाजिरवाण्या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक असलेल्या गौतम गंभीर याला टीकेचा सामना करावा लागत आहे.

IND vs SA : गौतम गंभीर..., गुवाहाटीतील पराभवानंतर भारताच्या माजी कर्णधाराने काय म्हटलं?
Gautam Gambhir and Kuldeep Yadav
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 27, 2025 | 8:30 PM

भारतीय कसोटी संघाला मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी 408 धावांनी पराभूत व्हावं लागलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामुळे भारतावर 0-2 ने पराभूत होण्याची नामुष्की ओढावली. भारताची ही मायदेशात व्हाईटवॉश होण्याची ही गेल्या 3 मालिकांमधील दुसरी वेळ ठरली. भारताला न्यूझीलंडनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध व्हाईटवॉशचा सामना करावा लागला. नेटकरी आणि क्रिकेट चाहत्यांनी भारताच्या या पराभवाला हेड कोच गौतम गंभीर याला जबाबदार ठरवलं.

भारताच्या या लाजिरवाण्या पराभवामुळे गंभीरवर चौफेर टीका करण्यात आली. गंभीरने या मालिकेसाठी घेतलेले काही निर्णय हे धाडसी ठरले. गंभीरच्या या निर्णयांमुळेच भारतावर व्हाईटवॉश होण्याची नामुष्की ओढावली असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे गंभीर टीकेचा धनी ठरत आहे. मात्र अशात भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी गंभीरची पाठराखण केली आहे. भारताच्या पराभवाला एकटा गंभीर जबाबदार नसल्याचा सूर गावसकरांचा आहे.

भारताच्या या पराभवानंतर गंभीरवर आजी-माजी खेळाडूंकडून टीका करण्यात आली. मात्र गावसकर यांचं मत वेगळं आहे. भारताच्या पराभवासाठी एकट्या गंभीरची चूक नाही. खेळाडूंनीही मैदानात चांगली कामगिरी केली नाही, असं गावसकर यांचं म्हणणं आहे.

लिटिल मास्टर काय म्हणाले?

“गौतम गंभीर प्रशिक्षक आहे. प्रशिक्षक संघाची मोट बांधू शकतो. प्रशिक्षक आपल्या अनुभवानुसार सल्ला देऊ शकतो. मात्र मैदानात तर खेळाडूंनाच खेळायचं आहे. गंभीरच्याच मार्गदर्शनात भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कपचं विजेतेपद मिळवलं आहे”, असं म्हणत गावसकरांनी गंभीरची पाठराखण केली. गावसकर यांनी इंडिया टुडेसोबत बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

“गावसकरांनी गंभीरवर टीका करणाऱ्यांना प्रश्न केला आहे. जी लोकं गंभीरला या पराभवासाठी जबाबदार ठरवत आहेत त्यांना माझा प्रश्न आहे की चॅम्पिन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकल्यानंतर तुम्ही काय केलं? तेव्हा तुम्ही गंभीरचा करार लाईफ टाईम केलात का?”,असा आक्रमक प्रश्न गावसकरांनी केला.

गौतम गंभीर याची हेड कोच म्हणून आकडेवारी

भारतीय संघाने आतापर्यंत गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनात एकूण 19 कसोटी सामने खेळले आहेत. भारताला त्यापैकी गंभीरच्या कोचिंगमध्ये निम्मे सामनेही जिंकले आले नाहीत. भारताने 19 पैकी 7 कसोटी सामन्यांत प्रतिस्पर्धी संघावर मात केली आहे. तसेच टीम इंडियाने 2 सामने ड्रॉ केले आहेत.