Gautam Gambhir : हेड कोचची गंभीर आकडेवारी, टेस्ट, वनडे आणि टी 20i कामगिरी कशी?
Team India Head Coach : राहुल द्रविड यांच्या जागी गौतम गंभीर यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. भारताची गंभीरच्या मार्गदर्शनात तिन्ही फॉर्मेटमधील कामगिरी कशी राहिली आहे? जाणून घ्या.

भारताला न्यूझीलंडनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात व्हाटईवॉशने पराभूत व्हावं लागलं. न्यूझीलंडने भारताला भारतात 2024 मध्ये 3-0 ने पराभूत केलं होतं. त्यानंतर आता 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताचा 2-0 ने धुव्वा उडवला. दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटी कसोटीत भारतावर 408 धावांनी मात केली. भारताचा हा मायदेशातील गेल्या 3 कसोटी मालिकांमधील दुसरा व्हाईटवॉश ठरला. भारताच्या या निराशाजनक कामगिरीनंतर हेड कोच गौतम गंभीर क्रिकेट चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. या निमित्ताने गंभीरची हेड कोच म्हणून तिन्ही फॉर्मेटमधील आकडेवारी जाणून घेऊयात.
गंभीरच्या मार्गदर्शनात भारतीय संघाने वनडे आणि टी 20i फॉर्मेटमध्ये अपवाद वगळता सरस कामिगरी केली आहे. मात्र गंभीर हेड कोच झाल्यापासून भारताला कसोटी क्रिकेटमध्ये लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाहीय.
वनडे क्रिकेटमधील रेकॉर्ड
गंभीरच्या मार्गदर्शनात भारताचा श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत 2-0 ने पराभव झाला होता. मालिकेतील एक सामना बरोबरीत राहिला होता. भारताने त्यानंतर सलग 8 सामन्यांसह चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. भारताने गंभीर हेड कोच झाल्यापासून 14 पैकी 9 वनडे सामने जिंकले आहेत. भारताला 4 वेळा पराभूत व्हावं लागलंय. तर 1 सामना हा अनिर्णित राहिला.
टी 20i रेकॉर्ड
रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने टी 20i वर्ल्ड कप विजयानंतर सर्वात छोट्या फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर गंभीरने श्रीलंकेविरुद्धच्या टी 20i मालिकेतून सूत्र हाती घेतली. गंभीरच्या मार्गदर्शनात भारताने 3 सामने जिंकले. त्यानंतर भारताची विजयी घोडदौड सुरुच राहिली. भारताने गंभीर हेड कोच झाल्यापासून 22 पैकी 20 सामने जिंकले आहेत. तर भारताला फक्त 2 टी 20i सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे गंभीरची व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये कामगिरी सरस आहे, हे आकड्यांवरुन स्पष्ट होतं.
कसोटी क्रिकेटमधील आकडे
भारताला गौतम गंभीर हेड कोच झाल्यानंतर मायदेशात न्यूझीलंडकडून 0-3 ने पराभव स्वीकारावा लागला. भारताने बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील 5 पैकी 3 सामने गमावले. भारताने इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिका 2-2 बरोबरीत राखली. भारताने वेस्ट इंडिजचा मायदेशात 2-0 ने धुव्वा उडवला. तर दक्षिण आफ्रिकेकडून 0-2 ने पराभूत व्हावं लागलं. एकूणच गंभीरच्या मार्गदर्शनात भारताने 19 पैकी 7 कसोटी सामने जिंकले आहेत. भारताने 2 कसोटी सामने अनिर्णित राखले आहेत.
