IND vs SA : हेड कोच गौतम गंभीर याचा पराभवानंतर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न! म्हणाला…
Gautam Gambhir Press Conference : गुवाहाटीतील पराभवानंतर टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर याच्यावर पत्रकार परिषदेत तिखट प्रश्नांचा मारा करण्यात आला. गंभीरनेही या प्रश्नांची पद्धतशीर उत्तरं दिली.

न्यूझीलंडनंतर दक्षिण आफ्रिकेने भारताचा भारतातच धुव्वा उडवला. दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटीतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतावर 408 धावांनी मात केली. दक्षिण आफ्रिकेने यासह भारताला 2-0 ने व्हाईटवॉश केलं. भारताचा हा मायदेशातील गेल्या 3 कसोटी मालिकांमधील सलग दुसरा व्हाईटवॉश ठरला. भारताची गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनात निराशाजनक कामगिरी राहिली. त्यामुळे गंभीरवर सडकून टीका केली जात आहे. गंभीरने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिका पराभवानंतर पत्रकार परिषदेला संबोधित केलं. गंभीरने या पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. गंभीरने या पत्रकार परिषदेत काही मुद्दे स्पष्ट केले. भारताच्या या कामगिरीसाठी हेड कोच म्हणून गंभीरला जबाबदार ठरवण्यात आलंय. मात्र गंभीरने दिलेल्या प्रतिक्रियेवरुन त्याने या पराभवाला आपण एकटे जबाबदार नसल्याचं सांगितलंय. गंभीरने काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.
हेड कोच गंभीर काय म्हणाला?
भारताच्या पराभवासाठी कुणी एक खेळाडू जबाबदार नाही. भारताच्या पराभवाला ड्रेसिंग रुममधील प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे”, असं गंभीरने म्हटलं. गंभीरच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा चर्चांना उधाण आलंय. गौतम गंभीर पराभवाची जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करतोय, असा सूर सोशल मीडियावर पाहायला मिळतोय.
भारताची निराशाजनक कामगिरी
भारतीय संघाने अपवाद वगळता या मालिकेतील दोन्ही सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. भारताच्या फलंदाजांनी तर घोर निराशा केली. कोलकातातील पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा अडीच दिवसांतच पराभव झाला. भारताने फिरकीसाठी पोषक खेळपट्टी तयार केली होती. मात्र भारतीय संघावरच आपला डाव उलटला. भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयासाठी मिळालेल्या 124 धावांचाही पाठलागही करता आला नव्हता. दक्षिण आफ्रिकेने हा सामना 30 धावांनी जिकंला होता.
तर दुसऱ्या कसोटीत भारताचा डाव हा 489 च्या प्रत्युत्तरात 201 धावांवर आटोपला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 260 रन्सवर डाव घोषित केला. त्यामुळे भारताला 549 धावांचं आव्हान मिळालं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेने भारताला 140 रन्सवर गुंडाळलं. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे हा सामना 408 धावांनी जिकंला. भारताचा हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा पराभव ठरला.
टीम इंडियाची गंभीर स्थिती
दरम्यान टीम इंडियाचा हा मायदेशातील गेल्या 3 कसोटी मालिकांमधील दुसरा व्हाईटवॉश ठरला. भारताने दक्षिण आफ्रिकेआधी वेस्ट इंडिजला 2-0 ने पराभूत केलं होतं. त्याआधी 2024 साली भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंडने भारतावर ऐतिहासिक विजय मिळवला होता. न्यूझीलंडने भारताला 3-0 ने व्हाईटवॉश केलं होतं.
