गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाचा दुसऱ्यांदा मोठा पराभव, राजीनामा देणार का? स्वत:च दिलं उत्तर
टीम इंडियावर देशात सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिका गमवण्याची वेळ आली. पहिल्यांदा न्यूझीलंडने आणि त्यानंतर दक्षिण अफ्रिकेने पराभवाची धूळ चारली. दोन्ही संघांनी टीम इंडियाला क्लिन स्विप दिला. त्यामुळे गौतम गंभीरवर टीकचे झोड उठली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचं टीम इंडियाचं स्वप्न पुन्हा एकदा भंगणार असं दिसत आहे. कारण भारतात झालेल्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला 2-0 ने क्लिन स्विप मिळाला आहे. त्यामुळे आता विजयी टक्केवारी वाढवण्याचं गणित खूपच कठीण झालं आहे. खरं तर गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाचा सलग दुसरा मोठा पराभव आहे. न्यूझीलंडनंतर दक्षिण अफ्रिकेने टीम इंडियाला क्लिन स्विप दिला. त्यामळे क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. इतकंच काय तर अनेकांनी गौतम गंभीरला प्रशिक्षणपदावरून दूर सारण्याची मागणी केली आहे. पण गौतम गंभीरने या चर्चांवर थेट उत्तर देत सांगितलं की, याबाबत निर्णय तो घेणार नाही, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ काय ते ठरवेल. इतकंच काय तर गौतम गंभीरने प्रत्युत्तर देताना सांगितलं की, त्याच्या कारकिर्दीत टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.
कसोटी प्रशिक्षणाबाबत गौतम गंभीर काय म्हणाला?
दक्षिण अफ्रिकेने क्लिन स्विप दिल्यानंतर गौतम गंभीरने या पराभवाचं खापर सर्वांवर फोडलं. त्याची सुरुवात स्वत:पासून होत असल्याचं सांगितलं. इतकंच काय तर पत्रकार परिषदेत भविष्यात कसोटी क्रिकेटचं प्रशिक्षकपद कायम असेल की नाही? याबाबतही प्रश्न विचारला गेला. तेव्हा गौतम गंभीरने सांगितलं की, ‘याबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी बीसीसीआयकडे आहे. मी प्रशिक्षक झाल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, मी महत्त्वाचा नाही. भारतीय क्रिकेट महत्त्वाचं आहे. तुम्ही हे विसरू नका की माझ्या प्रशिक्षणाखालीच भारताने इंग्लंडमध्ये कसोटी सीरिज ड्रॉ केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकला आहे.’
गौतम गंभीरने सांगितलं की, टीम इंडिया सध्या कात टाकत आहे. सध्याच्या संघात अनुभवाची उणीव आहे. इतकंच काय तर कसोटीत टीम इंडियाला नंबर 1 करायचं असेल तर त्याला प्राथमिकता देणं भाग आहे, असंही म्हंटलं. गौतम गंभीर म्हणाला की, ‘आम्हाला चांगलं खेळण्याची आवश्यकता आहे. 95/1 असताना अचानक 122 वर 7 विकेट हे स्वीकार्य नाही. तुम्ही एका खेळाडूला किंवा एका शॉटला दोष देऊ शकत नाही. मी कधीही कोणालाही दोष दिलेला नाही आणि देणारही नाही.’
