फलंदाजांना भीती आहे…! दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवानंतर सर्व बॅट्समनवर गंभीर आरोप

आयपीएल स्पर्धेच्या 39 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने निराशाजनक कामगिरी केली. दिल्लीच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. यानंतर डेल स्टेनने सध्याच्या फलंदाजांवर गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.

फलंदाजांना भीती आहे...! दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवानंतर सर्व बॅट्समनवर गंभीर आरोप
फलंदाजांना भीती आहे...! दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवानंतर सर्व बॅट्समनवर गंभीर आरोप
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 28, 2026 | 7:57 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील 39व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा डाव अवघ्या 75 धावांवर आटोपला. या संघाने फक्त 8 धावांवर 6 गडी गमावले होते. त्यामुळे 20 धावा होतात की नाही अशी स्थिती होती. पण दिल्लीने कशीबशी 75 धावांपर्यंत मजल मारली. दिल्ली कॅपिटल्सच्या या निराशाजनक कामगिरीनंतर माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने फलंदाजांवर गंभीर आरोप केला आहे. डेल स्टेनने सांगितलं की, सध्याच्या काळात फलंदाजांना हार्ड लेंथ गोलंदाजीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार केलं जात नाही. जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमारने या संधाची फायदा उचलला. हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमारने पहिल्या चार षटकात सहा विकेट काढल्या आणि दिल्ली कॅपिटल्सला पूर्णपणे बॅकफूटवर ढकललं. दिल्ली कॅपिटल्स संघ 75 धावांवर ऑलआऊट झाला. तर आरसीबीने 39 चेंडूत सामना जिंकला.

आयपीएल स्पर्धेत फलंदाजांची कामगिरी पाहून डेल स्टेनने सांगितलं की, सध्याच्या काळात फलंदाजांमध्ये कुठे ना कुठे भीती आहे. कारण त्यांनी हेझलवूड, भुवनेश्वर, कागिसो रबाडा आणि जोफ्रा आर्चरसारख्या गोलंदाजांच्या लेंथ असलेल्या चेंडू अभ्यास केलेला नाही. स्टेन म्हणाला की, ‘भुवी-हेझलवूड, केजी, आर्चरचा सामना करताना फलंदाजांमध्ये भीतीचं वातावरण आहे. असं नाही की ते घाबरले आहेत, पण त्या फलंदाजांना माहिती आहे की महान गोलंदाज कुठे गोलंदाजी करणार आहेत. असं असूनही फलंदाजांना त्या लेंथसाठी तयार केलं गेलं नाही. त्यामुळे त्यांच्याकडे उत्तर नाही. ‘

डेल स्टेनने पुढे सांगितलं की, स्पर्धेच्या मध्यात फलंदाजांना आपलं तंत्र बदलणं सोपं नाही. म्हणूनच गोलंदाज फलंदाजांवर हावी झाले आहेत. स्टेनने पुढे स्पष्ट केलं की, फलंदाजांसाठी हार्ड लेंथ सर्वात मोठी समस्या आहे. दिल्लीविरुद्ध भुवनेश्वर कुमारने तीन षटकात फक्त 5 धावा देऊन तीन बळी घेतली. तर जोश हेझलवूडने 12 धावात चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

Follow Us