
आयपीएल 2026 स्पर्धेसाठी फ्रेंचायझी परिपूर्ण संघ तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. संघातील कमकुवत बाजू सुधारण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. इतकंच काय तर खेळाडूंवर मोजले जाणारे पैशांचं गणितही जुळवलं जात आहे. असं असताना काही दिग्गज खेळाडूंना रिलीज केलं जाण्याची शक्यता आहे. खेळाडूंची किंमत मोठी आणि कामगिरी काहीच नाही अशा खेळाडूंना रिलीज केलं जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी संघात काही मोठे बदल दिसले तर आश्चर्य वाटायला नको. मुंबई इंडियन्सने तर याची सुरुवात करून टाकली आहे. दोन खेळाडूंना संघात घेतलं असून मोठी किंमत असलेल्या खेळाडूंना रिलीज करणार यात काही शंका नाही. असं असताना फ्रेंचायझी तीन वेगवान गोलंदाजांना रिलीज करू शकते. यात पहिलं नाव हे मिचेल स्टार्कचं आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत
दिल्ली कॅपिटल्स आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी मिचेल स्टार्कला रिलीज करू शकते. मिचेल स्टार्कवर कायमच आयपीएलमध्ये मोठी बोली लागल्याचं पाहायला मिळालं आहे. कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी खर्च करून त्याला संघात घेतलं होतं. तेव्हा त्याने ती किंमत योग्य असल्याचं दाखवून दिलं होतं. पण दिल्ली कॅपिटल्ससाठी त्याने 11.75 कोटींची किंमत काही वसूल करून दिली नाही. खरं तर त्याने टी20 फॉर्मेटला आधीच सोडचिठ्ठी दिली आहे. पण आयपीएल स्पर्धेत खेळत आहे.
लखनौ सुपर जायंट्स मयंक यादवला बाहेरचा रस्ता दाखवू शकते. कारण मयंक यादवला संघात घेऊनही फार काही फायदा झालेला नाही. मयंक 2022 पासून लखनौ सुपर जायंट्सचा भाग आहे. पण अजूनही फिट नाही. त्यामुळे तो संघात असून नसल्यासारखाच आहे. त्याला रिलीज करून एखादा चांगला गोलंदाज घेण्याच्या तयारीत लखनौ सुपर जायंट्स आहे. लखनौ सुपर जायंट्स मोहम्मद शमीसाठी प्रयत्नशील असल्याचं बोललं जात आहे. जर ट्रेड विंडोच्या माध्यमातून ही डील पक्की झाली तर नक्कीच मयंक यादवला सोडलं जाईल.
मुंबई इंडियन्स देखील दीपक चाहरला बाहेरचा रस्ता दाखवू शकते. मागच्या पर्वात दीपक चाहर मुंबईत आला. पण त्याची कामगिरी फार काही चांगली राहिली नाही. त्याने 14 सामन्यात फक्त 11 विकेट काढल्या. त्यात मुंबईत जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आहे. आता शार्दुल ठाकुरची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे दीप चाहरचा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे.