Video : मुंबई इंडियन्सने असं केलं शार्दुल ठाकुरचं स्वागत, पालघर स्टेशनवरच लावली होती जर्सी
लॉर्ड शार्दुल ठाकुरला अखेर मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. गेली काही वर्षे इतर फ्रेंचायझींकडून खेळला होता. मात्र आता त्याला घरच्या फ्रेंचायझीकडून खेळण्याची संधी मिळणार आहे. ट्रेड विंडोत मुंबईने अखेर त्याला संघात खेचलं आणि स्वागतही तसंच केलं.

आयपीएल 2026 स्पर्धेचे वेध फ्रेंचायझींना आतापासूनच लागले आहेत. बीसीसीआयने रिटेन्शन यादी जाहीर करण्याची तारीख 15 नोव्हेंबर जाहीर केली आहे. तत्पूर्वी काही खेळाडूंना संघात घेण्यासाठी फ्रेंचायझींची धावाधाव सुरू आहे. आयपीएल ट्रेड विंडोत मोठ्या डील होण्याची शक्यता आहे. असं असताना मुंबई इंडियन्सने दोन खेळाडूंना संघात ओढण्यात यश मिळवलं आहे. मुंबई इंडियन्सने लॉर्ड शार्दुल ठाकुर आणि वेस्ट इंडिजचा अष्टपैलू रदरफोर्डला संघात घेण्यात यश मिळवलं आहे. मुंबई इंडियन्सने शार्दुल ठाकुरसाठी लखनौ सुपर जायंट्सला 2 कोटी, तर रदरफोर्डसाठी गुजरात टायटन्सला 2.6 कोटी रुपये दिले. आता दोघेही आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. शार्दुल ठाकुरचं संपूर्ण क्रिकेट करिअर मुंबईकडून घडलं. त्यामुळे मुंबई इंडियन्स फ्रेंचायझी घरच्यासारखी आहे. त्यामुळे मुंबईकडून खेळण्याचा आनंद काही वेगळाच असणार आहे. असं असताना मुंबई इंडियन्सने त्याचं स्वागतही तसंच केलं.
मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टच्या माध्यमातून शार्दुल ठाकुरशी संवाद सुरु असल्याचं दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला पालघर स्टेशन दाखवलं आहे. तेव्हाच मोबाईल रिंग झाल्याचा आवाज ऐकू येतो. शार्दुल ठाकुर हा व्हिडीओ कॉल उचलतो. तेव्हा मुंबई इंडियन्सची जर्सी प्लॅटफॉर्मवरच्या पालघर लिहिलेल्या बोर्डवर लटकलेली दिसते. शार्दुल व्हिडीओ कॉल नीट पारखून बघतो आणि बोलतो की, ‘अरे पालघरला पलटण पोहोचली. एक नंबर.. घेऊन या घरी. ‘ शार्दुल चुटकी मारतो आणि अंगावर काही क्षणात मुंबई इंडियन्सची ब्लू जर्सी दिसते. त्यानंतर आनंदाच्या भरात बोलतो की, शार्दुल ठाकुर आला रे…
𝐓𝐑𝐀𝐃𝐄 ⬅ 𝐈𝐍
📲 𝐋𝐎𝐑𝐃 𝐓𝐇𝐀𝐊𝐔𝐑 incoming 😍💙 pic.twitter.com/TsoFQvCqkS
— Mumbai Indians (@mipaltan) November 13, 2025
शार्दुल ठाकुरची मुंबई इंडियन्स ही सातवी फ्रेंचायझी आहे. यापूर्वी पंजाब किंग्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला आहे. चेन्नई सुपर किंग्सकडून सर्वाधिक 5 वर्षे खेळला आहे. आयपीएल 2025 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना 10 सामन्यांमध्ये 13 विकेट्स घेतल्या. दरम्यान, देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीमध्ये शार्दुल ठाकूर मुंबईचे नेतृत्व करत आहे.
