
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सहा वर्षानंतर कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारताला 30 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. खरं तर हा सामना भारताच्या हातात होता. पण 124 धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली. या पराभवानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर हा पुन्हा एकदा टीकेचा धनी ठरला आहे. त्याच्या रणनितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. ईडन गार्डनवरील खेळपट्टीवर टीका केला जात आहे. पण असं असताना गौतम गंभीरने मात्र या खेळपट्टीचं समर्थन केलं आहे. जशी खेळपट्टी हवी होती अगदी तशीच खेळपट्टी मिळाली. पण भारतीय संघाने खूपच वाईट फलंदाजी केली. गौतम गंभीरने पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना समोरं गेल्यानंतर आपलं परखड मत व्यक्त केलं.
गौतम गंभीर म्हणाला की, ‘आम्ही अपेक्षित केली होती तशीच खेळपट्टी होती. आम्ही खूश होतो. आम्हाला तशीच खेळपट्टी हवी होती. क्यूरेटरने खूपच मदत केली. पण तुम्ही चांगले खेळले नाही तर असंच घडतं.’ गौतम गंभीरचा थेट इशारा भारतीय फलंदाजीवर होता. यावेळी त्याने दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याचं उदाहरण दिलं. “124 धावांचा पाठलाग करता येण्याजोगा होता. या खेळपट्टीत काहीही चूक नव्हती. बावुमा, अक्षर आणि सुंदर यांनी धावा काढून त्यांचे कौशल्य दाखवले. ज्यांचा बचाव चांगला होता त्यांनी धावा केल्या. तुम्हाला फिरकी गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. जर तुमचा बचाव मजबूत असेल तर तुम्ही अशा खेळपट्टीवर धावा करू शकता.”
प्रशिक्षक गौतम गंभीरने खेळपट्टीवर युक्तिवाद करताना फलंदाजांवर ताशेरे ओढले तरी पराभवाची सळ काही भरून निघणार नाही. भारताने घरच्या मैदानावर सहा पैकी चार कसोटी सामने गमावले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय फलंदाज फिरकीचा सामना करू शकले नाहीत. त्यामुळे या मालिकेत 3-0 ने पराभवाचं तोंड पाहावं लागलं. इतकंच काय तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं स्वप्नही भंगलं होतं. आता इतका सोपा सामना गमावल्याने यंदाही तसंच चित्र पाहायला मिळतं की काय असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. त्यामुळे भारताला आता कसोटी मालिका वाचवण्याचं मोठं आव्हान असणार आहे.