GT vs MI : मुंबईचा दणदणीत विजय, गुजरातचा 99 धावांनी धुव्वा, शुबमनसेनेचा हिशोब चुकता
Gujarat Titans vs Mumbai Indians Match Result, IPL 2026 : मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला त्यांच्या घरात घुसून लोळवलं आहे. मुंबईने गुजरातचा 99 धावांनी धुव्वा उडवला आहे. तिलक वर्मा मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. तिलकला शतकी खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL2026) 30 व्या सामन्यात दणदणीत असा विजय मिळवला आहे. मुंबईने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात यजमान गुजरात टायटन्ससमोर 200 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र मुंबईच्या गोलंदाजांसमोर गुजरातला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. मुंबईने गुजरातला 25 बॉलआधीच ऑलआऊट केलं. पलटणने गुजरातला 15.5 ओव्हरमध्ये 100 रन्सवर गुंडाळलं. मुंबईने अशाप्रकार 99 धावांनी हा सामना जिंकला. मुंबईने अशाप्रकारे 19 व्या मोसमातील एकूण दुसरा विजय मिळवला. मुंबईने यासह गुजरातला सलग चौथा सामना जिंकण्यापासून रोखत आपला सलग पाचवा पराभव टाळला.
मुंबईचा दुसरा विजय
मुंबई इंडियन्सचा अहमदाबादमधील हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील एकूण दुसरा तर गुजरात विरुद्धचा पहिला विजय ठरला. मुंबईने या मैदानात पहिला आणि शेवटचा आयपीएल स्पर्धेतील विजय हा 2014 साली मिळवला होता. गुजरात विरुद्धच्या 99 धावांच्या विजयाचे अश्वनी कुमार आणि तिलक वर्मा हे दोघे शिल्पकार ठरले. अश्वनी कुमार याने सर्वाधिक 4 विकेट्स घेत गुजरातचं कंबरडं मोडलं. तर त्याआधी तिलकने नाबाद शतक केलं. त्यामुळे मुंबईला 199 धावांपर्यंत पोहचता आलं.
मुंबईची बॅटिंग
तिलक वर्मा याने मुंबईच्या डावातील शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत आयपीएल कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक ठोकलं. तिलकने नाबाद 45 बॉलमध्ये नॉट आऊट 101 रन्स केल्या. तिलकने या खेळीत 7 सिक्स आणि 8 फोर ठोकले. त्याव्यतिरिक्त नमन धीर याने 45 धावांचं योगदान दिलं. तसेच कॅप्टन हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी प्रत्येकी 15-15 धावा केल्या. मुंबईने अशाप्रकारे 5 विकेट्स गमावून 199 धावांपर्यंत मजल मारली. तर गुजरातसाठी कगिसो रबाडा याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या.
गुजरातला पहिल्या बॉलवरच झटका
जसप्रीत बुमराह याने 200 धावांचा पाठलाग करायला आलेल्या गुजरातच्या सलामी जोडीला झटका दिला. बुमराहने साई सुदर्शन याला गोल्डन डक आऊट केलं. त्यानंतर मुंबईचे गोलंदाज गुजरातवर तुटून पडले. मुंबईच्या गोलंदाजासमोर एकालाही मोठी खेळी करता आली नाही. गुजरातसाठी वॉशिंग्टन सुंदर याने सर्वाधिक धावा केल्या. सुंदर व्यतिरिक्त एकालाही 20 पार पोहचता आलं नाही.
स्कोअरकार्ड
सुंदरने सर्वाधिक 26 धावा केल्या. शाहरुख खान याने 17, शुबमन गिल 14 आणि कगिसो रबाडा याने 12 धावा जोडल्या. या चौघांव्यरिक्त एकालाही दुहेरी आकड्यापर्यंत पोहचता आलं नाही. मुंबईसाठी अश्विन कुमार याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. अल्लाह गजनफर आणि मिचेल सँटनर या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. मुंबईने अशाप्रकारे सांघिक कामगिरीच्या जोरावर विजय मिळवला.