मुलासाठी हार्दिक पांड्या भावूक; वाढदिवशी लिहिली खास पोस्ट, ‘तू मला दररोज..’
भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याने मुलाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे. 30 जुलै रोजी हार्दिक आणि नताशाचा मुलगा अगस्त्यचा वाढदिवस होता. अगस्त्य सध्या त्याच्या आईसोबत सर्बियामध्ये आहे.
स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्याने 30 जुलै रोजी त्याचा मुलगा अगस्त्यचा वाढदिवस साजरा केला. काही दिवसांपूर्वीच हार्दिकने नताशा स्टँकोविकसोबत घटस्फोट जाहीर केला होता. त्यानंतर नताशा मुलाला घेऊन तिच्या मायदेशी म्हणजेच सर्बियाला गेली होती. अगस्त्य सध्या त्याच्या आईसोबत सर्बियामध्येच आहे. मुलाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिकने सोशल मीडियावर त्याच्यासोबतचा खास व्हिडीओ शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे. या व्हिडीओमध्ये हार्दिक त्याच्या मुलासोबत खेळताना आणि त्याला विविध ट्रिक शिकवताना दिसतोय. हार्दिकचं त्याच्या मुलासोबत असलेलं गहिरं नातं त्यातून स्पष्ट पहायला मिळतंय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत हार्दिकने लिहिलं, ‘प्रत्येक दिवशी तू मला पुढे जाण्यास मदत करतो. माझ्या पार्टनर इन क्राईमला, माझ्या पूर्ण हृदयाला, माझ्या आगूला (अगस्त्य) वाढदिवसाच्या शुभेच्छा. शब्दांपलीकडे तुझ्यावर प्रेम.’ नताशा सोशल मीडियावर मुलासोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ सतत शेअर करतेय. काही दिवसांपूर्वीच तिने त्याच्यासोबतचा पार्कमधील फोटो पोस्ट केला होता. त्यावर हार्दिकनेही कमेंट करत प्रेमाचा वर्षाव केला होता.
View this post on Instagram
हार्दिक आणि नताशाने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं होतं. हार्दिकने यामध्ये लिहिलं, ‘चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर नताशा आणि मी परस्परसंमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेत आहोत. आम्ही एकत्र राहण्याचा खूप प्रयत्न केला आणि नात्याला सर्वकाही दिलं. पण आमच्या दोघांच्या भल्यासाठी हाच निर्णय ठीक असेल असं आम्हाला वाटतं. कुटुंब म्हणून एकत्र राहिल्यानंतर, आनंदाने आणि आदराने एकमेकांचा सहवास अनुभवल्यानंतर हा निर्णय घेणं आमच्यासाठी खूप कठीण होतं.’
‘अगस्त्य हा आम्हा दोघांच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी नेहमीच राहील. आम्ही दोघं मिळून त्याचं संगोपन करू, जेणेकरून त्याच्या आनंदासाठी आम्ही आम्हाला शक्य ते सर्व प्रयत्न करू शकू. या कठीण आणि संवेदनशील काळात तुम्ही आम्हाला समजून घ्या अशी विनंती करतो’, अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या होत्या.
हार्दिक आणि नताशा हे दोघं लॉकडाउनदरम्यान एकमेकांना डेट करू लागले होते. त्यानंतर 31 मे 2020 रोजी त्यांनी लग्न केलं. त्याचवर्षी 30 जुलै रोजी नताशाने मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर गेल्या वर्षी हार्दिक-नताशाने पुन्हा लग्न केलं. ख्रिश्चन आणि हिंदू विवाहपद्धतीनुसार त्यांनी सर्व विधी केल्या होत्या.