
भारताने आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि जेतेपदावर नाव कोरलं. अंतिम सामन्यात नाजूक स्थिती असताना भारतीय फलंदाजांनी हारिस रऊफवर प्रहार केला. या सामन्यात हारिस रऊफने टाकलेल्या 3.4 षटकात म्हणजेच 22 चेंडूत 50 धावा दिल्या. प्रति षटक 13 चा इकोनॉमी रेट होता. त्याला एकही विकेट मिळाली नाही. म्हणजेच भारताच्या विजयात हारिस रऊफच्या षटकात केलेल्या धावा भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या. शेवटच्या षटकात टीम इंडियाला विजयासाठी 10 धावांची आवश्यकता होती. त्या धावा देखील 4 चेंडूत देऊन टाकल्या. त्यामुळे हारिस रऊफवर पाकिस्तानी फॅन्स भडकले आहेत. तसेच त्याला संघाबाहेर करण्याची मागणी होत आहे. हारिस रऊफचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात तो निवृत्तीबाबत बोलत आहे. पण खरंच यात काही तथ्य आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
हारिस रऊफने निवृत्ती घेतल्याची ज्या काही बातम्या सोशल मीडियावर सुरु आहेत त्यात काहीच तथ्य नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ बनावट आहे. हारिस रऊफने कुठेच निवृत्तीबाबत काहीच सांगितलेले नाही. त्याच्या अधिकृत सोशल मिडिया खात्यावर असं काहीच लिहिलं किंवा पोस्ट केलेलं नाही. इतकंच काय तर पीसीबीने देखील त्याच्या निवृत्तीबाबत काहीच सांगितलेलं नाही. त्यामुळे या निव्वळ अफवा आहेत.
हारिस रऊफची भारताविरूद्धची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. इतकंच काय तर त्याचं वर्तन देखील तसंच आहे. त्यामुळे अनेकदा वादाला समोरं जावं लागलं आहे. हारिस रऊफने मैदानात प्रेक्षकांना हाताचे इशारे करत प्लेन पडल्याची कृती केली होती. त्याची तक्रार बीसीसीआयने केली होती. त्यानंतर सामनाधिकाऱ्यांनी त्याला दंड ठोठावला होता. दुसरीकडे, माजी कर्णधार आणि कोच मोहम्मद युसूफने सांगितलं की, ‘हारिसने अनेक वेळा शेवटच्या षटकात सामने गमावले आहेत. त्याला शेवटचं षटक द्यायला नको होतं. 2022 वर्ल्डकपमध्येही अमेरिकेविरुद्ध त्याला धावा रोखता आल्या नव्हत्या. आम्ही त्याच्या सोबत काय करावं?’