गतविजेता आरसीबी फ्रेंचायझीची होणार विक्री? फरार ललित मोदींनी सांगितली आतली बातमी
आयपीएल 2026 स्पर्धेची जोरदार तयारी सध्या सुरु आहे. फ्रेंचायझी ट्रेड विंडोच्या माध्यमातून खेळाडूंची देवाणघेवाण करण्यास सज्ज आहेत. दुसरीकडे, गजविजेत्या आरसीबी संघाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. फरार ललित मोदीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची आतली बातमी सांगितली आहे.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात 17 वर्षे जेतेपदापासून वंचित राहूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा मोठा चाहता वर्ग आहे.गेली अनेक पर्व हे चित्र पाहिलं गेलं आहे. पण चाहत्यांना मागच्या पर्वात आनंदाची बातमी मिळाली. गेल्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जेतेपदावर नाव कोरलं. त्यामुळे आरसीबीच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. आरसीबीच्या चाहत्यांनी आनंदोत्सव साजरा केला. पण आता आरसीबीच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. फरार ललित मोदीने आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी एक अपडेट दिली आहे. यातून आयपीएल 2025 विजेता संघ नव्या मालकाच्या शोधात असल्याचं दिसत आहे. ललित मोदीने आपल्या सोशल मिडिया हँडलवर याबाबतची माहिती दिली आहे. इतकंच काय हे देखील स्पष्ट केले की आता या फ्रँचायझीमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर करार आणि नवीन गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी का असू शकते?
ललित मोदी यांनी इंस्टाग्रामवर लिहिलं की, पूर्वी आरसीबीच्या विक्रीबद्दल फक्त अफवा होत्या. पण आता मालकांनी त्यांच्या बॅलन्स शीटमधून आरसीबी काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे, असं दिसतंय. ललित मोदी इतक्यावर थांबले नाहीत. आरसीबी एक नवीन मूल्यांकन विक्रम प्रस्थापित करू शकते, असं देखील सांगितलं. त्यांनी या फ्रेंचायझी विक्रीला शुभेच्छा देखील दिल्या. “मला खात्री आहे की ही टीम फ्रँचायझी म्हणून विक्रीसाठी पूर्णपणे उपलब्ध असेल. एक प्रमुख ग्लोबल फंड किंवा सॉवरेन फंड त्यात गुंतवणूक करू शकतो. यापेक्षा चांगली गुंतवणूक संधी असू शकत नाही. जो कोणी आरसीबी खरेदी करेल, मी त्यांना शुभेच्छा देतो.”
View this post on Instagram
मागच्या पर्वात गुजरात टायटन्सला नवा मालक मिळाला होता. टोरेंट ग्रुपने गुजरात टायटन्सची मालकी घेतली होती. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला नवा मालक मिळाला तर आश्चर्य वाटायला नको. आरसीबीचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे फ्रेंचायझी कोणीही विकत घेतली तरी काही फरक पडणार नाही. पण किती पैसे मोजावे लागतील याकडे लक्ष लागून आहे. खरं तर ही माहिती फरार ललित मोदी यांनी शेअर केली आहे. त्यामुळे यावर किती विश्वास ठेवावा हे देखील तितकंच खरं आहे. कारण यापूर्वीही फ्रेंचायझी विक्रीच्या अफवा उडाल्या होत्या. तेव्हा त्यांचं खंडन करण्यात आलं होतं.
