IND vs PAK : वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानशी हँडशेक होणार की नाही? आयसीसीचा नियम काय सांगतो?
भारत आणि पाकिस्तान संघ चौथ्या रविवारी आमनेसामने येत आहे. मागच्या तीन रविवारी भारतीय पुरुष संघाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता. आता महिला संघाची पाळी आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 5 ऑक्टोबरला सामना होणार आहे. पण हँडशेक करणार की नाही याबाबत संभ्रम आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्वच संबंध मोडले आहे. क्रिकेटच्या मैदानातही याचे पडसाद दिसून आले. भारतीय संघ खेळाच्या मैदानात फक्त बहु सांघिक स्पर्धेत पाकिस्तानशी सामना करतो. आशिया कप बहु सांघिक स्पर्धा असल्याने भारत पाकिस्तान यांच्यात सामना झाला. पण झालेले तिन्ही सामने बऱ्याच कारणाने चर्चेत राहिले. भारताने पाकिस्तानसोबत हँडशेक करण्यास नकार दिला. इतकंच काय तर पाकिस्तानच्या मोहसिन नकवी यांच्या हातून ट्रॉफी देखील घेतली नाही. या संदर्भात पाकिस्तानने आयसीसीकडे दाद मागितली होती. पण आयसीसीने स्पष्ट केलं होतं की, या स्पर्धेवर आशियाई क्रिकेट परिषदेचं अधिपत्य आहे. त्यामुळे या विषयात फार काही झालं नाही. पण आता वुमन्स वर्ल्डकप असून आयसीसीचं अधिपत्य आहे. वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारताकडे आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले भारत पाकिस्तान संघ 5 ऑक्टोबरला या स्पर्धेत भिडणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेत भारताची रणनिती काय असेल याकडे लक्ष असेल.
भारतीय पुरुष संघासारखंच महिला संघ नो हँडशेक पॉलिसी फॉलो करेल का? की आयसीसीच्या प्रोटोकॉलमुळे असं करणं भाग पडेल? तसं पाहीलं तर सामन्यानंतर एका संघाने दुसऱ्या संघाशी हँडशेक करावं असा काही नियम नाही. पण खेळ भावना लक्षात घेता असं केलं जातं. आशिया कप स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने पाकिस्तानशी हँडशेक केलं नाही. पण आयसीसी स्पर्धा नसल्याने या प्रकरणी आयसीसी शांत होते. पण वुमन्स वर्ल्डकप आयसीसीच्या अधिपत्याखाली येत आहे. त्यामुळे आयसीसी बोलेल तसं वागावं लागू शकतं.पण भारतीय महिला संघाला या बाबत काही सूचना दिल्यात की नाही याबाबत काही स्पष्ट नाही. पण भारतीय महिला संघाने तसंच केलं तर पाकिस्तानकडून आयसीसीकडे तक्रार केली जाण्याची शक्यता आहे. आयसीसीला देखील यात हस्तक्षेप करावा लागेल.
माजी महिला क्रिकेटपटूंनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. 1978 चा वर्ल्डकप खेळणाऱ्या शोभा पंडित म्हणाल्या की, ‘खेळाडूंवर खेळाशिवाय राजकीय दबाव असणार आहे. पण मी भारतीय संघ आणि कर्णधार हरमनप्रीत कौरला पाठिंबा देईल. मग त्याने हँडशेक करो अगर नको.’ दुसरीकडे, महिला क्रिकेटपटू संध्या अग्रवाल यांनी सांगितलं की, ‘महिला संघाने अगदी पुरुष संघाप्रमाणे वागलं पाहीजे. जसं सूर्याने केलं अगदी तसंच हरमनप्रीत कौरने करावं. पण यामुळे काही अतिरिक्त दबाव वगैरे येईल असं वाटत नाही.’ दरम्यान, मागच्या वेळी दोन्ही संघ आमनेसामने आले तेव्हा दोन्ही संघात मैत्रिपूर्ण वातावरण दिसलं होतं. पण यावेळी परिस्थिती बदलली आहे.
