WTC 2027 अंतिम सामन्यात टीम इंडिया कशी खेळणार? जाणून घ्या पुढच्या कसोटी सामन्यांचं गणित

भारताने दक्षिण अफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका 2-0 ने गमावल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच गणित बिघडलं आहे. गुणतालिकेत भारताची घसरण पाचव्या स्थानावर झाली आहे. असं असताना भारत अंतिम फेरीसाठी क्वॉलिफाय होऊ शकतो का? चला जाणून घेऊयात गणित

WTC 2027 अंतिम सामन्यात टीम इंडिया कशी खेळणार? जाणून घ्या पुढच्या कसोटी सामन्यांचं गणित
WTC 2027 अंतिम सामन्यात टीम इंडिया कशी खेळणार? जाणून घ्या पुढच्या कसोटी सामन्यांचं गणित
Image Credit source: BCCI Twitter/Freepik
Updated on: Nov 26, 2025 | 6:43 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याचं भारताचं स्वप्न अजूनही अर्धवट आहे. यंदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं चौथं पर्व सुरु आहे. मात्र या पर्वातही अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगणार अशीच स्थिती आहे. भारताने पहिल्या आणि दुसऱ्या पर्वात अंतिम फेरी गाठली होती. मात्र दोन्ही वेळेस पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तिसऱ्या पर्वात न्यूझीलंडविरुद्धची मालिका 3-0 ने गमावली आणि अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं. आता दक्षिण अफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने मात दिली आणि तशीच स्थिती उद्भवली आहे. आतापर्यंत तीन मालिकांमध्ये भारताने एकूण 9 सामने खेळले आहेत. इंग्लंडविरुद्ध 5, वेस्ट इंडिजविरुद्ध 2 आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 2 सामने जिंकली आहे. या नऊ सामन्यांपैकी टीम इंडियाने 4 सामन्यात विजय, 4 सामन्यात पराभव आणि एक सामना ड्रॉ झाला आहे. आता टीम इंडियाची विजयी टक्केवारी कमालीची घसरली असून पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. पहिल्या दोन स्थानावर जागा मिळवण्यासाठी टीम इंडियाचं पुढचं गणित म्हणजे तारेवरची कसरत आहे.

टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 या स्पर्धेत एकूण 9 सामने खेळायचे आहेत. यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर पाच सामने होणार आहेत. तर श्रीलंकेविरुद्ध त्यांच्या देशात दोन सामन्यांची मालिका आणि न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्या देशात दोन सामन्यांची मालिका होणार आहे. त्यामुळे उर्वरित नऊ सामन्यात भारताला विजयी टक्केवारी वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी टीम इंडियाला उर्वरित 9 पैकी 7 सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळेच विजयी टक्केवारी 62.66 टक्क्यांपर्यंत जाईल. 8 सामन्यात विजय मिळवला तर विजयी टक्केवारी 68.52 टक्के होईल. दुसरीकडे, दक्षिण अफ्रिका, पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या पराभवासाठी देव पाण्यात बुडवून ठेवावे लागतील.

भारताचा या वर्षात एकही कसोटी सामना नाही. आता भारतीय संघ थेट पुढच्या वर्षी म्हणजेच ऑगस्ट 2026 मध्ये कसोटी मालिका खेळण्यासाठी उतरणार आहे. यावेळी भारतीय संघ पहिल्यांदा श्रीलंका दौऱ्यावर जाईल. या दौऱ्यात भारताचं पुढचं गणित काय ते स्पष्ट होईल. भारताने या मालिकेतील दोन्ही सामने गमावले तर अंतिम फेरीचं गणित काही जुळणार नाही. दुसरीकडे, न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत जाऊन 2-0 मात देणं वाटतं तितकं सोपं नाही. तर ऑस्ट्रेलिया भारतात येणार आहे. पम 5-0 ने मालिका गमवेल असं अजिबात होणार नाही. त्यामुळे यंदाही भारताचं गणित जुळणं कठीण दिसत आहे.