Mohammed Siraj : त्या एका फोटोमुळे विजयाचा विश्वास, मोहम्मद सिराजने सर्वच सांगितलं, पाहा व्हीडिओ

Mohammed Siraj Post Match Presentation : पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात 9 विकेट्स घेऊन मोहम्मद सिराज याने भारताला विजयी करण्यात प्रमुख भूमिका बजावली. सिराजला या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

Mohammed Siraj : त्या एका फोटोमुळे विजयाचा विश्वास, मोहम्मद सिराजने सर्वच सांगितलं, पाहा व्हीडिओ
Mohammed Siraj Post Match Presentation
Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 04, 2025 | 7:18 PM

मोहम्मद सिराज याने केलेल्या निर्णायक गोलंदाजीमुळे भारताने केनिंग्टन ओव्हलमध्ये झालेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील शेवटच्या दिवशी इंग्लंडवर 6 धावांनी थरारक विजय साकारला. टीम इंडिया या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर होती. त्यामुळे इंग्लंडला मालिका विजयापासून रोखण्यासाठी भारताला हा सामना कोणत्याही स्थितीत जिंकणं गरजेचं होतं. भारताने चाहत्यांची निराशा न करता इंग्लंडला पराभवाची धुळ चारली. भारतीय संघाने यासह 5 सामन्यांची मालिका 2-2 अशा फरकाने बरोबरीत सोडवली. मोहम्मद सिराज हा भारताच्या विजयाचा नायक ठरला. सिराजने या सामन्यात एकूण 9 विकेट्स घेतल्या.

भारताला विजयी करण्यात एका फोटोने निर्णायक भूमिका बजावली. सिराजने या विजयानंतर प्रतिक्रिया देताना या फोटोचो उल्लेख केला. सिराजने 7 अक्षरांच्या एका शब्दाबाबत काय सांगितलं? तो शब्द काय होता? हे सविस्तर जाणून घेऊयात.

सिराजने फोटोबाबत काय सांगितलं?

“मी आज सकाळी झोपेतून उठलो तेव्हा गूगलवरुन एक फोटो डाऊनलोड केला. मी विश्वास (Believe) हा वॉलपेपर डाऊनलोड केला. त्यामुळे आम्ही हा सामना जिंकू असा मला विश्वास होता”, असं सिराजने सांगितलं.

टीम इंडियाचं जोरदार कमबॅक

भारतीय संघ या सामन्यात चौथ्या दिवशी बॅकफुटवर होता. इंग्लंडला पाचव्या दिवशी विजयसाठी फक्त 35 धावांची गरज होती. तर हातात 4 विकेट्स होत्या. मात्र भारतीय गोलंदाजांनी कमाल केली आणि इंग्लंडला बॅकफुटवर ढकललं.

सिराजची कडक बॉलिंग

जेमी ओव्हरटन याने पाचव्या दिवसातील पहिल्याच ओव्हरमध्ये प्रसिध कृष्णा याच्या बॉलिंगवर 2 चौकार लगावले. मात्र त्यानंतर सिराजने पाचव्या दिवशी त्याच्या पहिल्या ओव्हरमध्येच जेमी स्मिथ याला आऊट केलं. त्यानंतर सिराजने जेमी ओव्हरटन याला 9 धावांवर बाद करत इंग्लंडला आठवा झटका दिला. त्यानंतर प्रसिध कृष्णा याने जोश टंग याला क्लिन बोल्ड करत नववा झटका दिला.

मोहम्मद सिराज काय म्हणाला?

त्यानंतर फ्रॅक्चर हातासह ख्रिस वोक्स मैदानात आला. उपस्थित क्रिकेट चाहत्यांनी जागेवर उभ राहत वोक्सचा उत्साह वाढवला. मात्र वोक्स इंग्लंडला विजयी करु शकला नाही. मोहम्मद सिराज याने गस एटकीन्सन याला बोल्ड केलं आणि भारताने हा सामना अवघ्या 6 धावांनी जिंकला.