Champions Trophy 2025 : आयसीसीकडून ‘टीम ऑफ टुर्नामेंट’ जाहीर, भारताचे 6 खेळाडू, कॅप्टन रोहितला डच्चू
Icc Champions Trophy 2025 : आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम फेरीतील सामन्यानंतर मोठी घोषणा करत रोहित शर्मा याला झटका दिला आहे.

भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कपनंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला. टीम इंडियाची आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघाने ही कामगिरी केली. कर्णधार रोहित शर्माने अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 252 धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावांचं योगदान देत विजयात प्रमुख भूमिका बजावली. रोहितने 83 बॉलमध्ये 76 रन्स केल्या. रोहितने कर्णधारपदाला आणि त्याच्या लौकीकाला साजेशी अशी खेळी केली. मात्र त्यानंतर अवघ्या काही तासांनी आयसीसीने कर्णधार रोहित शर्मा याला मोठा झटका दिला आहे.
आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 टीम ऑफ टुर्नामेंटची घोषणा केली आहे. आयसीसी प्रत्येक स्पर्धेनंतर सर्वोत्तम 11 किंवा 12 खेळाडूंची नावं जाहीर करते. आयसीसीने आताही तसंच केलंय. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 12 खेळाडूंचा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी टीम ऑफ टुर्नामेंटमध्ये समावेश केला आहे. आयसीसीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे. आश्चर्यकारक म्हणजे या 12 खेळाडूंमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा याचा समावेश करण्यात आलेला नाही.
आयसीसीने जाहीर केलेल्या टीममध्ये 50 टक्के टीम इंडियाचे खेळाडू आहेत. या टीममध्ये 12 पैकी 6 खेळाडू भारतीय आहेत. न्यूझीलंडच्या 4 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तर अफगाणिस्तानच्या दोघांना संधी देण्यात आली आहे. तसेच न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याला टीम ऑफ टुर्नामेंट संघाचं कर्णधार करण्यात आलं आहे. मात्र रोहितचा समावेश न केल्याने क्रिकेट चाहत्यांकडून संताप आणि आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
टीम इंडियाचे 6 खेळाडू कोण?
आयसीसीने स्पर्धेतील सर्वोत्तम संघात 12 पैकी 6 भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांची निवड केली आहे. तर उपविजेत्या न्यूझीलंडकडून रचीन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मॅट हेनरी आणि मिचेल सँटनर यांना संधी देण्यात आली आहे. सँटनरकडे या संघांचं कर्णधारपद आहे. तर इब्राहिम झाद्रान आणि अजमतुल्लाह ओमरजई अफगाणिस्तानच्या या दोघांची निवड करण्यात आली आहे.
‘टीम ऑफ टुर्नामेंट’
The much-awaited Champions Trophy Team of the Tournament is here 🤩
A look at the stars who made it ➡ https://t.co/83j5aSeDyA pic.twitter.com/g6o2hESn2V
— ICC (@ICC) March 10, 2025
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 टीम ऑफ टुर्नामेंट : रचीन रवींद्र, इब्राहिम झाद्रान, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, अजमतुल्लाह ओमरजई, मिचेल सँटनर (कॅप्टन), मोहम्मद शमी, मॅट हेनरी आणि वरुण चक्रवर्ती. अक्षर पटेल (12वा खेळाडू)
