
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा रंगतदार स्थितीत आहे. ए ग्रुपमधून टीम इंडिया आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. तर बी ग्रुपमधून अजून एकही संघ पुढील फेरीत पोहचला नाही. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेमी फायनलसाठी चुरस पाहायला मिळत आहे. अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्याच्या निकालानंतर बी ग्रुपमधून सेमी फायनलमध्ये पोहचणारी पहिली टीम निश्चित होईल.या सामन्याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. अशात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाने त्याच्या प्रतिक्रियेने खळबळ उडवून दिली आहे. माझी ही शेवटची आयसीसी स्पर्धा असू शकते, असं संकेत या खेळाडूने दिले आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रॅसी व्हॅन डर ड्यूसेन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळतोय. रॅसी व्हॅन डर ड्यूसेन याने अफगाणिस्तानविरुद्ध 21 फेब्रुवारीला अर्धशतकी खेळी केली. दक्षिण आफ्रिकेने हा सामना 107 धावांनी जिंकला. तर दक्षिण आफ्रिकेचा या स्पर्धेतील दुसरा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना हा पावसामुळे रद्द झाला. तर दक्षिण आफ्रिका साखळी फेरीतील तिसरा सामना हा 1 मार्चला इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. या सामन्याआधी रॅसी व्हॅन डर ड्यूसेन याने प्रतिक्रिया दिली.
“ही माझी शेवटची आयसीसी स्पर्धा आहे निश्चितपणे संभव आहे. इतके सारे खेळाडू देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी समोर येत आहेत आणि ते चांगलं खेळतही आहेत, ही सकारात्मक बाब आहे. ट्रिस्टन स्टब्ससारखे खेळाडू बाहेर आहेत. संघात स्थान कायम ठेवण्यासाठी चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे, तसं केलं नाही तर माझी जागा कुणी दुसरा घेईल, हे मला माहित आहे”, असं रॅसी व्हॅन डर ड्यूसेन म्हणाला. रॅसी व्हॅन डर ड्यूसेन 36 वर्षांचा आहे. रॅसी व्हॅन डर ड्यूसेन याने निवृत्त व्हायचं ठरवलं असल्याचा अंदाज या प्रतिक्रियेवरुन वर्तवण्यात येत आहे.
रॅसी व्हॅन डर ड्यूसेन याने दक्षिण आफ्रिकेचं 18 कसोटी, 69 एकदिवसीय आणि 50 टी 20i सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. रॅसी व्हॅन डर ड्यूसेन याने कसोटीत 6 अर्धशतकांसह 905 धावा केल्या आहेत. तसेच वनडेत 6 शतकं आणि 15 अर्धशतकांसह 2 हजार 516 धावा केल्या आहेत. तर टी 20i क्रिकेटमध्ये 9 अर्धशतकांसह 1 हजार 257 रन्स केल्या आहेत.