
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याने 23 फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करत विजय मिळवून दिला. विराट कोहली याने या सामन्यात झळकावलेलं शतक हे त्याच्या एकदिवसीय कारकीर्दीतील 51 वं शतक ठरलं. विराटने यासह एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. याआधी विराटने भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत 15 नोव्हेंबरला शतक केलं होतं. विराटच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे 50 वं शतक ठरलं. विराटने या शतकासह सचिन तेंडुलकर याच्या 49 एकदिवसीय शतकांचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला होता. विराटने आतापर्यंत सचिनचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. त्यामुळे कायमच विराटची तुलना सचिनसोबत केली जाते. अनेकदा सचिन आणि विराट या दोघांपैकी सर्वोत्तम कोण? असा प्रश्नही उपस्थित केला जातो. टीम इंडियाचे माजी कर्णधार लिटिल मास्टर अर्थात सुनील गावसकर यांनी या प्रश्नाचं काय उत्तर दिलंय? जाणून घेऊयात.
सुनील गावसकर यांनी सचिन आणि विराट या दोघांची एकमेकांसह तुलना करण्यास नकार दिला. 2 वेगवळ्या युगातील तुलना करणार नाही, असं गावसकर यांनी स्पष्टपणे म्हटलं.
“मी कधीही 2 वेगवेगळ्या युगांची तुलना करणार नाही. तुम्हाला माहित आहे की परिस्थिती वेगळी असते, खेळपट्टी वेगळी असते. तसेच प्रतिस्पर्धी वेगळे असतात. त्यामुळे 2 महान खेळाडूंची तुलना करणं फार अवघड आहे”, असं गावसकर यांनी म्हटलं.
“आपण कायमच खेळाडूंची तुलना करत राहणार. रिकी पॉन्टिंग ग्रेग चॅपल यांच्यापेक्षा भारी आहे? असं कधी कुणाला विचारताना पाहिलंय? कुणालाच नाही. सध्याच्या खेळाडूंना ते आहेत तसेच स्वीकार करा. कोणतीच तुलना नाही. हे केवळ उपमहाद्वीपमध्येच होत राहतं. आपण कायम तुलना करत राहतो”, असं गावसकर यांनी म्हटलं.
पाहा व्हीडिओ
Sunil Gavaskar ji on –
Sachin vs Virat comparison who is better and why? pic.twitter.com/srhPf9ltvp— AT10 (@Loyalsachfan10) February 27, 2025
दरम्यान टीम इंडियाने साखळी फेरीतील सलग दोन्ही सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियाने बांगलादेश आणि पाकिस्तानचा पराभव केला आहे. तर टीम इंडिया साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना हा 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे.