Virat Kohli : शतक 1 विक्रम अनेक, कोहलीकडून दुबईत रेकॉर्ड्सवर रेकॉर्ड्स, पाकिस्तानचा धुव्वा उडवत काय काय केलं?
India vs Pakistan Virat Kohli World Record : विराट कोहली याला 'किंग कोहली' आणि 'रनमशीन' असं का म्हटलं जातं? हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलंय. विराटने दुबईत पाकिस्तानविरुद्ध शतक करत टीम इंडियाला विजयी केलं. विराटने या खेळीदरम्यान रेकॉर्ड्सचा पाऊस पाडला.

टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला. टीम इंडियाला पाकिस्तानने विजयासाठी 242 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताचा अनुभवी फंलदाज विराट कोहली याने चौकार ठोकत विजय मिळवून दिला आणि आपलं शतक पूर्ण केलं. विराट कोहली याने विजयी चौकारासह शतक झळकावलं. विराटने या शतकी खेळीदरम्यान असंख्य विक्रम आपल्या नावावर केले. विराटने या सामन्यात काय काय केलं? हे सविस्तर जाणून घेऊयात.
वेगवान 14 हजार एकदिवसीय धावा
विराटने 13 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर एकेरी धाव 14 धावा पूर्ण केल्या. विराटने यासह वेगवान एकदिवसीय 14 हजार धावा पूर्ण केल्या. विराटने यासह सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. विराटने 287 डावात ही कामगिरी केली. तर सचिनने 350 डावात ही कामगिरी केली होती. तसेच विराट हा सचिन आणि कुमार संगकारा या दोघानंतर 14 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा एकूण तिसरा तर पहिला सक्रीय फलंदाज ठरला.
आयसीसी स्पर्धेतील अर्धशतकांचं ‘अर्धशतक’
विराटने या खेळीदरम्यान अर्धशतक झळकावलं. विराटचं हे एकदिवसीय कारकीर्दीतील एकूण 73 वं तर आयसीसी एकदिवसीय स्पर्धेतील 50 वं अर्धशतक ठरलं.
विराटने 111 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने नाबाद शतक केलं. विराटच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे एकूण 51 वं तर 82 वं आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. तसेच विराटचं हे चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिलं तर आयसीसी स्पर्धेतील एकूण सहावं शतक ठरलं. सोबतच विराट पाकिस्तानविरुद्ध आशिया कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड कप या तिन्ही स्पर्धेत शतक करणारा पहिला फलंदाज ठरला.
‘मॅन ऑफ द मॅच’
विराटला या खेळीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. विराटने या पुरस्कारासह त्याचा आणखी एक रेकॉर्ड भक्कम केला. विराट आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक 5 वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू ठरला.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), इमाम उल हक, बाबर आझम, सौद शकील, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि अबरार अहमद.
