
रोहित शर्मा आणि विराट कोहली टीम इंडियाची अनुभवी जोडी ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर आता मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत खेळण्यासाठी सज्ज आहे. उभयसंघातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला 30 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेला अवघे काही तास शिल्लक असताना रोहित शर्माला आनंदाची बातमी मिळाली आहे. रोहितने आयसीसी वनडे रँकिंगमध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावलं आहे. तसेच या रँकिंगमध्ये टीम इंडियाचा दबदबा पाहायला मिळत आहे.
रोहितने अखेरचा एकदिवसीय सामना हा 25 ऑक्टोबला ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता. त्यानंतर आता रोहित बरोबर 1 महिन्यांनंतर एक्शन मोडमध्ये दिसणार आहे. या मोठ्या अंतरामुळे रोहितला आठवड्याआधी 19 नोव्हेंबर रोजी वनडे रँकिंगमधील पहिलं स्थान गमवावं लागलं होतं. न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज डॅरेल मिचेल रोहितला मागे टाकत नंबर 1 वनडे बॅट्समन ठरला होता. मात्र रोहितने एकाच आठवड्यात डॅरेल मिचेल याचा हिशोब केलाय. रोहित डॅरेलला मागे टाकत पुन्हा एकदा पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे.
आयसीसीकडून दर आठवड्यात कसोटी, वनडे आणि टी 20i या तिन्ही फॉर्मेटमधील क्रमवारी जाहीर करण्यात येते. या सुधारित एकदिवसीय क्रमवारीत रोहितने पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. डॅरेल मिचेल याला झालेली दुखापत रोहितसाठी फायदेशीर ठरली. डॅरेलच्या दुखापतीमुळे रोहितला 1 महिना सामना न खेळूनही पहिलं स्थान मिळालं आहे. डॅरेलला दुखापतीमुळे 2 एकदिवसीय सामन्यांत खेळता आलं नाही. त्यामुळे डॅरेलच्या खात्यातील रेटिंग पॉइंट्समध्ये घट झाली.
ताज्या आकडेवारीनुसार, रोहित शर्मा वनडे रँकिंगमध्ये 781 रेटिंग पॉइंट्ससह पहिल्या स्थानी आहे. तर डॅरेल मिचेलच्या खात्यात 766 रेटिंग पॉइंट्स आहेत. रोहित व्यतिरिक्त टॉप 10 मध्ये टीम इंडियाचे 3 फलंदाज आहेत. यामध्ये कर्णधार शुबमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे. शुबमन, विराट आणि श्रेयस या तिघांच्या खात्यात 745, 725 आणि 700 इतके रेटिंग पॉइंट्स आहेत.
दरम्यान टी 20I रँकिंगमध्ये ऑलराउंडर्सच्या यादीत टॉप 10 मध्ये एकमेव भारतीय आहे. हार्दिक पंड्या सहाव्या स्थानी विराजमान आहे. हार्दिकच्या खात्यात 211 रेटिंग पॉइंट्स आहेत. तर या यादीत झिंबाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा हा पहिल्या स्थानी आहे. सिकंदर रझा सध्या पाकिस्तान टी 20I ट्राय सीरिजमध्ये खेळत आहे.