T20i World Cup 2026 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी रोहित शर्मा याला मोठी जबाबदारी, आयसीसीची घोषणा
Rohit Sharma T20i World Cup 2026 : टीम इंडियाचा वर्ल्ड कप विजेता माजी कर्णधार आणि एकदिवसीय संघाचा फलंदाज रोहित शर्मा याच्या शिरपेचात मानाचा तुरो खोवला गेला आहे. आयसीसीने रोहितला मोठी जबाबदारी दिली आहे.

आयसीसीने आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत 20 संघांमध्ये 55 सामने होणार आहेत. या 20 संघांना 5-5 नुसार 4 गटात विभागण्यात आलं आहे. गतविजेता भारतीय संघाला ए ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं आहे. भारतासह या गटात नामिबिया, युएई, नेदरलँड्स आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. आयसीसीने याबाबतची घोषणा केली आहे.
रोहित टी 20i वर्ल्ड कप ब्रँड ॲम्बेसेडर
टीम इंडिया टी 20i वर्ल्ड कप गतविजेता आहे. भारताने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 2024 साली दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. रोहितने या ऐतिहासिक कामगिरीनंतर टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. रोहितच्या निवृत्तीनंतर सूर्यकुमार यादव याला टी 20i संघाच्या नेतृत्वाची धुरा देण्यात आली. सूर्यानेही रोहितचा वारसा यशस्वीपणे चालवला आहे. सूर्याच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत एकही टी 20i मालिका गमावलेली नाही. त्यामुळे भारतात होणाऱ्या या स्पर्धेत चाहत्यांना सूर्याकडून टी 20i वर्ल्ड कप जिंकून देण्याची आशा आहे. तर दुसऱ्या बाजूला आयसीसीने रोहितला सन्मानित केलं आहे. आयसीसीने रोहितची टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या ब्रँड ॲम्बेसेडरपदी नियुक्ती केली आहे.
रोहितची पहिली प्रतिक्रिया
रोहितने त्याची ब्रँड ॲम्बेसेडरपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. “माझ्यासाठी हा मोठा सन्मान आहे. सक्रीय खेळाडू असतानाही आतापर्यंत क्रिकेटमध्ये कुणालाही ब्रँड ॲम्बेसेडर करण्यात आलेलं नाही. मी गेल्या वर्षाप्रमाणे कामगिरी करेन, अशी आशा आहे”, असं रोहितने म्हटलं
“वर्ल्ड कप जिंकणं आव्हानात्मक”
आयसीसी ट्रॉफी जिंकणं मोठं आव्हान आहे. मी स्वत: याचा अनुभव घेतला आहे. क्रिकेटमध्ये मला 18 वर्ष पूर्ण झाले आहेत. कारकीर्दीच्या सुरुवातीला 2 आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्यानंतर आणखी काही ट्रॉफी जिंकल्या आहेत. मात्र दरम्यानच्या काळात संघ आणि टीम मॅनेजमेंट आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी किती उत्सूक होतो याची आठवण आहे”, असंही रोहितने नमूद केलं.
रोहितची टी 20i स्पर्धेतील कामगिरी
रोहित टी 20i क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. रोहित 2007 ते 2024 दरम्यान झालेल्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत खेळला आहे. रोहितने या स्पर्धेत 1 हजार पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. रोहितने 44 डावांत 1 हजार 220 धावा केल्या आहेत. रोहितने या दरम्यान 12 अर्धशतकं झळकावली आहेत.
