
आगामी 10 व्या आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला (Icc T20 World Cup 2026) मोजून काही दिवस बाकी आहेत. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा गतविजेता असलेल्या भारत आणि श्रीलंककडे आहे. एकूण 20 संघात एका ट्रॉफीसाठी रस्सीखेच असणार आहे. स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत यंदा अनेक संघ पहिल्यांदाच सहभागी होणार आहेत. त्यामुळे या संघांच्या कामगिरीकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे. त्याआधी मोठी अपडेट समोर आली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे.
बीसीबीने बांगलादेशला टीमला भारतात वर्ल्ड कप स्पर्धेसाठी न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भारत-बांगलादेश यांच्यातील वाद उफाळल्यानंतर बीसीबीने हा निर्णय घेतलाय. बीसीबीने याबाबत आयसीसीला पत्र लिहिलं आहे. बीसीबीने या पत्राद्वारे बांगलादेशच्या सामन्यांचं आयोजन हे श्रीलंकेत करण्यात यावं, अशी विनंती केली आहे. आता आयसीसी बीसीबीच्या या विनंतीवर काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आयसीसीने बीसीबीच्या बाजूने निर्णय दिल्यास त्यांचे सर्व सामने हे पाकिस्तानप्रमाणे श्रीलंकेत होतील. मात्र आयसीसीने या विनंतीस नकार दिला तर बीसीबीची भूमिका काय असणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
भारत-बांगलादेश यांच्यातील वाद उफाळलाय. बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर अन्याय केला जात असल्याचं म्हटलं जात आहे. बांगलादेशचा भारताबाबत असलेला राजकीय दृष्टीकोन आणि परिस्थिती पाहता त्यांनाही त्यांच्याच पद्धतीने धडा शिकवावा, अशी संतप्त भावाना भारतीयांची आहे. त्यानुसार आयपीएल स्पर्धेसाठी केकेआर संघात असलेल्या बांगलादेशी मुस्तफिजूर रहमान याची हकालपट्टी करण्यात यावी, अशी भारतीयांची तीव्र मागणी होती. वाढता दबाव आणि संताप पाहता बीसीसीआयने केकेआरला तसे आदेश दिले. केकेआरने (Kolkata Knight Riders) बीसीसीआयच्या आदेशानंतर रहमानला संघातून मुक्त केलं. याच एका मुद्द्यावरुन बांगलादेश क्रिकेट बोर्डाने रडरड सुरु केलीय.
रहमानला आयपीएल स्पर्धेतून वगळल्याने बीसीबीला अचानक बांगलादेशच्या खेळाडूंचा सुरक्षेचा मुद्दा आठवला. बीसीबीने बांगलादेशला टीमला सुरक्षेच्या कारणास्तव वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात पाठवत नसल्याचं सांगितलं. तसेच बांगलादेशचे सामने श्रीलंकेत आयोजित करण्यात यावेत, अशी विनंती आता बीसीबीने आयसीसीला केलीय. श्रीलंका टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेची सहयजमान आहे.
दरम्यान या स्पर्धेतील 20 संघांना 5-5 नुसार 4 गटात विभागण्यात आलंय. सी ग्रुपमध्ये बांगलादेशसह वेस्ट इंडिज, इंग्लंड, नेपाळ आणि इटलीचा समावेश आहे. आयसीसीने बीसीबीची बांगलादेशचे सामने श्रीलंकेत आयोजित करण्याची मागणी मान्य केल्यास सी ग्रुपमधील वरीच 4 संघांना फटका बसेल. इंग्लंड, विंडीज, नेपाळ आणि इटलीला फक्त एका सामन्यासाठी श्रीलंकेत जावं लागेल. यामध्ये चारही संघांचा पैसा आणि वेळ वाया जाणार. त्यामुळे आयसीसी 4 संघांच्या हिताचा विचार करणार की बांगलादेशच्या बाजूने निकाल देणार? याची क्रिकेट चाहत्यांना उत्सूकता लागून आहेत. तसेच आयसीसीने बांगलादेशच्या विरोधात निर्णय दिल्यास बीसीबी स्पर्धेवर बहिष्कार टाकणार का? हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.