T20 WC 2026, Super 8 : शुक्रवारपासून सुपर 8 चा थरार, टीम इंडियाचा पहिला सामना कधी? पाहा वेळापत्रक

Icc T20i World Cup 2026, Super 8 Schedule : आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या साखळी फेरीनंतर आता सुपर 8 राउंडमध्ये 8 संघात 4 जागांसाठी चढाओढ असणार आहे. उपांत्य फेरीतील एकूण 4 जागांसाठी 8 पैकी कोणते संघ पात्र ठरणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

T20 WC 2026, Super 8 : शुक्रवारपासून सुपर 8 चा थरार, टीम इंडियाचा पहिला सामना कधी? पाहा वेळापत्रक
T20i World Cup 2026 Super 8 Team
Image Credit source: Icc X Account/ Created with Nano Banana on Google Gemini
| Updated on: Feb 21, 2026 | 2:17 AM

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडला आहे. क्रिकेट चाहत्यांना साखळी फेरीत एकूण 20 संघांमध्ये 40 सामने पाहायला मिळाले. चाहत्यांना या दरम्यान 2 उलटफेर पाहण्याची संधी मिळाली. झिंबाब्वे टीमने ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर श्रीलंकेला पराभूत केलं. तसेच टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात क्रिकेट प्रेमींना चक्क डबल सुपर ओव्हर पाहायला मिळाली. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तावर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. साखळी फेरीतून 12 संघांचं पॅकअप झालं. तर 8 संघांनी सुपर 8 फेरीत धडक दिली. आता सुपर 8 फेरीत क्रीडा प्रेमींना एकसेएक सामने पाहायला मिळणार आहेत.

8 संघ आणि 12 सामने

सुपर 8 फेरीत एकूण 8 संघात 12 सामने खेळवण्यात येणार आहेत. सुपर 8 फेरीत 21 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान हे सामने होणार आहेत. सुपर 8 मधील 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर 3 संघाविरुद्ध 1 सामना खेळणार आहे. त्यानुसार दोन्ही गटातील प्रत्येकी 2 अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

कोणत्या ग्रुपमध्ये कोणती टीम?

ए ग्रुप : टीम इंडिया, वेस्ट इंडिज, झिंबाब्वे आणि दक्षिण आफ्रिका

बी ग्रुप : श्रीलंका, इंग्लंड, पाकिस्तान आणि न्यूझीलंड

टीम इंडियाचा सुपर 8 मधील पहिला सामना कधी?

यजमान आणि गतविजेता टीम इंडियाचा सुपर 8 मधील पहिला सामना हा रविवारी 22 फेब्रुवारी होणार आहे. सुपर 8 निमित्ताने 2024 च्या टी 20I वर्ल्ड कप अंतिम फेरीतील 2 संघ आमेनसामने येणार आहेत. टीम इंडियासमोर सुपर 8 फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं आव्हान आहे.

त्यानंतर टीम इंडिया सुपर 8 फेरीतील आपला दुसरा सामना 26 फेब्रुवारीला खेळणार आहे. तर सूर्यासेनेचा सुपर 8 फेरीतील तिसरा आणि अंतिम समना हा 1 मार्चला वेस्ट इंडिज विरुद्ध होणार आहे.

ए ग्रुपमधील चारही संघ अजिंक्य

दरम्यान ए ग्रुपमधील सर्वच्या सर्व 4 संघांनी साखळी फेरीत उल्लेखनीय कामगिरी करत सुपर 8 मध्ये धडक दिली आहे. या 4 संघांनी साखळी फेरीत एकही सामना गमावलेला नाही. टीम इंडियाने यूएसए, नामिबिया, पाकिस्तान आणि नेदरलँड्सला पराभूत केलंय.

वेस्ट इंडिजने साखळी फेरीत स्कॉटलंड, इंग्लंड, नेपाळ आणि इटलीला पराभूत केलंय. झिंबाब्वेने ओमान, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेला पराभूत केलं. तर झिंबाब्वेचा आयर्लंड विरुद्धचा सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. तर दक्षिण आफ्रिकेने कॅनडा, अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि यूएईला पराभूत केलंय. त्यामुळे सुपर 8 फेरीत या 4 पैकी कोणते संघ आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.