ENG vs WI : विंडीजचा सलग दुसरा विजय, इंग्लंडचा वर्ल्ड कपमध्ये 10 वर्षांनतर धुव्वा

England vs West Indies Icc T20i World Cup 2026 Match Result : वेस्ट इंडिज क्रिकेट टीमने ऑलराउंड कामगिरी करत आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सलग दुसरा विजय साकारला आहे. विंडीजने शाई होप याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली आहे.

ENG vs WI : विंडीजचा सलग दुसरा विजय, इंग्लंडचा वर्ल्ड कपमध्ये 10 वर्षांनतर धुव्वा
Gudakesh Motie WI vs ENG T20i World Cup 2026
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 11, 2026 | 11:13 PM

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत वेस्ट इंडिज क्रिकेट टीम आपला धमाका सुरु ठेवण्यात यशस्वी ठरली आहे. विंडीजने बुधवारी 11 फेब्रुवारीला वर्ल्ड कप मोहिमेतील आपला सलग आणि एकूण दुसरा सामना जिंकला आहे. विंडीजने स्पर्धेतील 15 व्या सामन्यात इंग्लंडवर मात करत ही कामगिरी केली आहे. विंडीजने शेरफेन रुदरफोर्ड याने केलेल्या विस्फोटक खेळीच्या जोरावर इंग्लंडसमोर 197 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडला आपल्या जाळ्यात अडकवलं. विंडीजने इंग्लंडला 6 बॉलआधी ऑलआऊट केलं. इंग्लंडचा डाव 19 ओव्हरमध्ये 166 रन्सवर आटोपला. विंडीजने अशाप्रकारे हा सामना जिंकला. विंडीजने यासह 10 वर्षांची प्रतिक्षा संपवली. विंडीजने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 10 वर्षांनी इंग्लंडवर विजय मिळवला.

विंडीजने या सामन्यात बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर जबरदस्त कामगिरी केली. इंग्लंडने टॉस जिंकल्यानंतर विंडीजला बॅटिंगसाठी भाग पाडलं. विंडीजची सलामी जोडी झटपट आऊट झाली. त्यानंतर 5 फलंदाजांनी निर्णायक भूमिका बजावली. शेरफेन रुदरफोर्ड याने सर्वाधिक आणि नाबाद 76 धावांचं योगदान दिलं. तर रोस्टन चेज याने बॅटिंगनंतर बॉलिंगनेही कमाल केली. रोस्टनने 34 धावा केल्या. तर इतरांनीही योगदान दिलं. विंडीजने अशाप्रकारे 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 196 धावांपर्यंत मजल मारली.

इंग्लंडची बॅटिंग

फिलिप सॉल्ट आणि जोस बटलर या सलामी जोडीने इंग्लंडला 38 धावांची भागीदारी मिळवून दिली. मात्र विंडीजच्या गोलंदाजांनी इंग्लंडला ठराविक अंतराने झटके दिले. विंडीजच्या गोलंदाजांसमोर एकाही फलंदाजाला तग धरता आला नाही. त्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांना चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करता आली नाही. ऑलराउंडर सॅम करन याने एकट्याने लढत देत इंग्लंडला विजयी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही.

विंडीजच्या फिरकीपटूंची कमाल, इंग्लंडला गुंडाळलं

सॅम करन याने सर्वाधिक आणि नाबाद 43 धावा केल्या. जेकब बेथेल याने 33 तर फिलिप सॉल्ट याने 30 धावांचं योगदान दिलं. त्याव्यतिरिक्त इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला 30 पार पोहचता आलं नाही. फिरकीपटू गुडाकेश मोती याने विंडीजसाठी सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. रोस्टन चेज याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर शामर जोसेफ, अकील होसेन आणि रोमरिया शेफर्ड या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. तर जेसन होल्डर याने कडक फिल्डिंगच्या जोरावर इंग्लंडच्या 2 फलंदाजांना रन आऊट केलं. विंडीजने या सलग दुसऱ्या विजयासह सुपर 8 चा दावा आणखी मजबूत केला आहे.