टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाची धडक, सलग दुसऱ्यांदा मिळवला मान

आयसीसी अंडर 19 वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली आहे. एकही सामना न गमवता अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. अंतिम फेरीत टीम इंडियाचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. या सामन्यात जी कमालिनीने जबरदस्त खेळी केली.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाची धडक, सलग दुसऱ्यांदा मिळवला मान
Image Credit source: BCCI
| Updated on: Jan 31, 2025 | 2:43 PM

आयसीसी अंडर 19 टी20 वर्ल्डकप 2025 स्पर्धेचं जेतेपद टीम इंडियापासून एक पाऊल दूर आहे. भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा 9 गडी राखून पराभव केला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फसला असंच म्हणावं लागेल. कारण भारताने इंग्लंडला 113 धावांवर रोखलं. डेविना पेरिन आणि कर्णधार अबी नॉर्ग्रोव्ह हे दोन खेळाडू वगळता एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. 20 षटकात 8 गडी गमवून 113 धावा केल्या आणि विजयासाठी 114 धावांचं आव्हान दिलं. भारताने हे आव्हान एक गडी गमवून पूर्ण केलं. गोंगाडी त्रिशा ही 29 चेंडूत 5 चौकाराच्या मदतीने 35 धावा करून बाद झाली. गोंगाडीने कामालिनीसोबत 60 धावांची भागीदारी केली. त्यानंतर उर्वरित धाा जी कमालिनी आणि सानिका शेळके यांनी विजय मिळवून दिला. भारताने 15 षटकात 1 गडी गमवून हे आव्हान पूर्ण केलं. भारताने यासह अंतिम फेरीत सलग दुसऱ्यांदा धडक मारली आहे. भारताचा अंतिम फेरीत सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे.

उपांत्य फेरीत परुनिका सिसोदियाने सर्वोत्तम कामगिरी केली. इंग्लंडची धावसंख्या धीमी करण्यात तिचा मोलाचा हात राहिला. तीने 4 षटकात 21 धावा देत 3 गडी तंबूत पाठवले. त्यानंतर या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या वैष्णवी शर्मानेही इंग्लंडचं कंबरडं मोडलं. तिनेही आपल्या फिरकीवर इंग्लंडला नाचवलं. तिने 4 षटकात 23 धावा देत 3 गडी बाद केले. तर आयुषी शुक्लाने 2 गडी बाद करण्यात यश मिळवलं. दुसरीकडे, फलंदाजीत जी कमालिनीने कमाल केली. तिने 50 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 56 धावांची खेळी केली.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत महिला अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): जी कमलिनी (विकेटकीपर), गोंगडी त्रिशा, सानिका चाळके, निकी प्रसाद (कर्णधार), ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, आयुषी शुक्ला, जोशिता व्हीजे, शबनम मो. शकील, पारुनिका सिसोदिया, वैष्णवी शर्मा.

इंग्लंड महिला अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): डेविना सारा टी पेरिन, जेमिमा स्पेन्स, ट्रूडी जॉन्सन, अबी नॉर्ग्रोव्ह (कर्णधार ), शार्लोट स्टब्स, केटी जोन्स (विकेटकीपर), प्रिशा थानावाला, टिली कॉर्टीन-कोलमन, फोबी ब्रेट, शार्लोट लॅम्बर्ट, अमू सुरेनकुमार.