Womens World Cup Final: वर्ल्ड कपसाठी भारत-दक्षिण आफ्रिकेत कडवी झुंज, 25 वर्षांनी मिळणार नवा चॅम्पियन, कोण जिंकणार?

Icc Womens World Cup 2025 Final : दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा तर टीम इंडियाने तिसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक दिली आहे. त्यामुळे आता या दोघांपैकी कोणत्या संघाचं विश्व विजेता होण्याचं स्वप्न पूर्ण होणार? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे.

Womens World Cup Final: वर्ल्ड कपसाठी भारत-दक्षिण आफ्रिकेत कडवी झुंज, 25 वर्षांनी मिळणार नवा चॅम्पियन, कोण जिंकणार?
Harmanpreet Kaur and Laura Wolvaardt IND vs SA
Image Credit source: Alex Davidson-ICC/ICC via Getty Images
| Updated on: Oct 31, 2025 | 7:22 PM

तब्बल 30 सामन्यानंतर अखेर आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील अंतिम फेरीतील 2 संघ निश्चित झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेने 29 ऑक्टोबरला गुवाहाटीत झालेल्या उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा 125 धावांनी धुव्वा उडवला. दक्षिण आफ्रिकेने यासह अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. तर हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात भारतीय संघाने गुरुवारी 30 ऑक्टोबरला गतविजेत्या आणि अजिंक्य असलेल्या ऑस्ट्रेलियाचा माज उतरवला. भारताने 339 धावांचं आव्हान 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं आणि फायनलमध्ये प्रवेश मिळवला. या दोन्ही संघांनी आतापर्यंत वर्ल्ड कप जिंकलेला नाही. त्यामुळे क्रिकेट विश्वाला यंदा नवा वर्ल्ड चॅम्पियन मिळणार असल्याचं निश्चित आहे.

वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी रविवारी महामुकाबला होणार आहे. हा सामना नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. भारताने याच मैदानात झालेल्या उपांत्य सामन्यात कांगारुंना लोळवलं होतं.

टीम इंडिया तिसऱ्यांदा फायनलमध्ये

टीम इंडियाची अंतिम फेरीत पोहचण्याची यंदाची एकूण तिसरी तर 2017 नंतरची पहिली वेळ ठरली आहे. वूमन्स टीम इंडियाला 2017 साली वर्ल्ड कपने हुलकावणी दिली होती. इंग्लंडने भारताला फायनलमध्ये पराभूत केलं होतं. तर भारताच्या महिला ब्रिगेडने 2005 साली पहिल्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र तेव्हा ऑस्ट्रेलियाने भारताला वर्ल्ड कप जिंकण्यापासून रोखलं होतं.

तसेच यंदा 25 वर्षांनंतर नवा वर्ल्ड कप विजेता संघ मिळणार आहे. याआधी 2000 साली असं झालं होतं. न्यूझीलंडने तेव्हा कांगारुंना लोळवत वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. त्याव्यतिरिक्त इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या 2 संघांचीच वर्ल्ड कप स्पर्धेत मक्तेदारी होती. आतापर्यंत फक्त इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 संघांनाच वर्ल्ड कप जिंकता आला आहे. त्यामुळे यंदा क्रिकेट विश्वाला वर्ल्ड कप जिंकणारा चौथा संघ मिळणार आहे.

दक्षिण आफ्रिका-इंडिया तिसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार?

दरम्यान वनडे वर्ल्ड कप स्पर्धेनिमित्ताने भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट संघ तिसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार आहेत. याआधी मेन्स टीम इंडियाने 2024 साली रोहित शर्मा याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत 2007 नंतर पहिल्यांदा एकूण दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावली होती.

तसेच काही महिन्यांपूर्वी वूमन्स अंडर 19 टी20 वर्ल्ड कप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका-भारत यांच्यात महामुकाबला झाला होता. या सामन्यातही भारतानेच विजय मिळवत अंडर 19 चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला होता. त्यानंतर महिला ब्रिगेड वनडे वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी भिडणार आहेत.