IND vs SA Final : भारत दक्षिण अफ्रिका अंतिम फेरीचा पावसामुळे रद्द झाला तर विजेता कोण? जाणून घ्या
वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि दक्षिण अफ्रिका आमनेसामने येणार आहेत. क्रिकेटविश्वाला नवा विजेता मिळणार हे आता नक्की झालं आहे. पण हा सामना पावसामुळे रद्द झाला तर विजेता कोण असेल? ते जाणून घ्या

वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच नवा विजेता मिळणार आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं हे 13वं पर्व असून आतापर्यंत भारत आणि दक्षिण अफ्रिका दोन्ही संघांची झोळी रितीच राहिली आहे. 1973 साली वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली होती. पहिल्या पर्वात इंग्लंडने बाजी मारली होती. ऑस्ट्रेलियाने 7 वेळा इंग्लंडने 4 वेळा, तर न्यूझीलंडने एकदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वात भारत दक्षिण अफ्रिका स्पर्धेतून नवा विजेता मिळणार हे नक्की झालं आहे. वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना 2 नोव्हेंबरला नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीत होणार आहे.
भारत दक्षिण अफ्रिका अंतिम सामन्यात पाऊस पडला आणि सामना रद्द करण्याची वेळ आली तर विजेता कसा घोषित करणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. उपांत्य फेरीत गुणतालिकेच्या आधारावर अंतिम फेरीचं तिकीट दिलं जाणार हे निश्चित होतं. पण आता अंतिम फेरीत काय? तर अंतिम फेरीत पाऊस पडला तर एक दिवस राखीव ठेवला आहे. खरं तर हा सामना 2 नोव्हेंबरला पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न असेल. डकवर्थ लुईस नियमानुसार टार्गेट दिलं जाईल. पण हा सामना त्या दिवशी झालाच नाही तर मग एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. 3 नोव्हेंबरला हा सामना होईल.
राखीव दिवशीही सामना झाला नाही तर विजेता कोण?
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना झाला नाही तर गुणतालिकेच्या आधारावर विजेता ठरवणार का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण अंतिम फेरीचा सामना राखीव दिवशीही पावसामुळे झाला नाही तर विजेता विभागून दिला जाईल. म्हणजेच भारत आणि दक्षिण अफ्रिका यांना संयुक्त विजेता घोषित केलं जाईल.
भारत दक्षिण अफ्रिका साखळी फेरीतील सामन्याचा निकाल
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात साखळी फेरीत लढत झाली होती. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने भारतावर 3 गडी राखून विजय मिळवला होता. भारताने 49.5 षटकांचा सामना करून सर्व गडी गमवून 251 धावा केल्या होत्या. तर विजयासाठी 252 धावांचं आव्हान दिलं होतं. दक्षिण अफ्रिकेने हे आव्हान 48.5 षटकात 7 गडी गमवून पूर्ण केलं.
