
टीम इंडियाने न्यूझीलंडला टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत केलं. टीम इंडियाने यासह टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील तिसरी ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील न्यूझीलंड विरुद्धचा पहिलाच विजय ठरला. तर पराभवामुळे न्यूझीलंडला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. न्यूझीलंडची अंतिम फेरीत पराभूत होण्याची ही दुसरी वेळ ठरली. टीम इंडियाने याह 2021 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधील पराभवाची परतफेड केली. तेव्हा न्यूझीलंडने केन विलियमसन याच्या नेतृत्वात भारताला पराभूत केलं होतं.
टीम इंडियाने रविवारी 8 मार्च रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये न्यूझीलंड विरुद्ध 5 विकेट्स गमावून 255 धावा केल्या. न्यूझीलंडला प्रत्युत्तरात 19 ओव्हरमध्ये ऑलआऊट 159 धावापर्यंतच पोहचता आलं. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने अंतिम सामन्याआधी वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी कोटी भारतीयांचं मन दुखावावं लागलं तरी चालेल, असं म्हटलं होतं. त्याच सँटनरच्या टीमला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतरही सँटनरची मस्ती कमी झाली नाही. सँटनरने या पराभवानंतर त्याला आपल्या टीमवर गर्व असल्याचं म्हटलं.
“मला माझ्या खेळाडूंवर गर्व आहे. या स्पर्धेदरम्यान आम्हाला अनेक आव्हानांचा सामना कारावा लागला. आम्ही प्रत्येक टप्प्यावर त्या आव्हानांचा यशस्वीपणे सामना केला आणि चांगली कामगिरी केली. मात्र आज आम्ही एका चांगल्या संघाविरुद्ध आणि क्रिकेट चाहत्यांसमोर अपयशी ठरलो. मात्र त्यानंतरही मला माझ्या संघावर गर्व आहे”, सँटनर पराभवानंतर अशी प्रतिक्रिया दिली.
सँटनरने या दरम्यान टीम इंडियाच्या चाहत्यांबाबतही प्रतिक्रिया दिली. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारताला पाठिंबा देण्यासाठी लाखोंच्या घरात क्रिकेट चाहते आले होते. या निमित्ताने निळं वादळ पाहायला मिळालं.
“जेव्हा पण आम्ही खेळतो तेव्हा मोठ्या प्रमाणात चाहत्यांची उपस्थिती पाहायला मिळते. मैदानात आज निळा समुद्र (क्रिकेट चाहत्यांना उद्देशून) पाहायला मिळाला. आम्ही निश्चितच त्यांचे आवडीचे नव्हतो. मात्र टीम इंडियाला घरच्या मैदानात वर्ल्ड कप विजयाचं श्रेय द्यावं लागेल. घरात जिंकणं हे कायमच आव्हानात्मक असतं. सूर्यकुमार यादव आणि त्याच्या टीमला त्यांनी केलेल्या कामगिरीसाठी गर्व असायला हवं”, असं म्हणत सँटनरने टीम इंडियाचं कौतुक केलं.