IND vs AFG: तिसरा सामना पावसामुळे रद्द होणार? जाणून घ्या कसं असेल हवामान
IND vs AFG 3rd ODI Weather Forecast Report : भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या एकिदवसीय सामन्यात पावसाने खोडा घातला होता. त्यात आता तिसऱ्या सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

अफगाणिस्तानच्या भारत दौऱ्याची सांगता (Afghanistan Tour Of India 2026) 20 जूनला होणार आहे. यजमान टीम इंडिया अफगाणिस्तान विरूद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. भारताने सलग दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर केली. आता टीम इंडिया सलग तिसरा एकदिवसीय सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हा सामना शनिवारी 20 जून रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्यामुळे हा सामना रद्द होणार का? अशी चाहत्यांना भीती आहे. या निमित्ताने चेन्नईत सामन्यादरम्यान हवामान कसं असेल? हे जाणून घेऊयात.
हवामान कसं असेल?
भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 1 वाजता टॉस होईल. सामना सुरु होण्यादरम्यान पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे. तर संध्याकाळपर्यंत पावसाची शक्यता कमी होईल. मालिकेतील पहिल्या सामन्यातही पावसाने खोडा घातला होता. पाऊस 13 जून रोजी जोरदार बरसला. त्यामुळे 50 ऐवजी 25 ओव्हरचा सामना खेळवण्यात आला. त्यामुळे चेन्नईतही पाऊस आला तर 50 षटकांचा खेळ होणार नाही, इतकं मात्र निश्चित आहे.
हवामानाचा अंदाज काय?
एक्युवेदरच्या रिपोर्ट्सनुसार, सामन्यादरम्यान ढगाळ वातावरण असेल. तसेच पावसाची शक्यता ही 50 टक्के इतकी आहे. तर संध्याकाळी पावसाची शक्यता 17 ने कमी होऊन 33 टक्के इतकी होईल.
भारतीय संघाची चेन्नईतील आकडेवारी
भारतीय संघाने वनडेत चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमध्ये किती सामने जिंकले आहेत? हे जाणून घेऊयात. टीम इंडियाने या मैदानात 1987 साली पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. तेव्हापासून टीम इंडियाने या मैदानात एकूण 15 सामने खेळले आहेत.
टीम इंडियाने या मैदानात 15 पैकी 8 सामने जिंकले आहेत. तर 6 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर भारताचा या मैदानातील 1 सामना हा रद्द करावा लागला होता. त्यामुळे भारतीय संघाचा शनिवारी सामना जिंकून या मैदानातील आकडेवारी आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न असणार आहे.
शुबमन गिल किती धावा करणार?
दरम्यान भारतीय क्रिकेट चाहत्यांचं तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात कर्णधार शुबमन गिल याच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. शुबमनने अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात 84 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या सामन्यात शुबमनने 154 धावांची खेळी केली होती. त्यामुळे शुबमन तिसऱ्या सामन्यात द्विशतकापर्यंत पोहचणार का? याची चाहत्यांना उत्सूकता असणार आहे.