बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी टेन्शन! भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचं वेन्यू बदलणार? जाणून घ्या काय आहे कारण
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. खराब प्रकाश आणि थंडीमुळे या मालिकेच्या प्रस्तावित वेळापत्रकात बदल केला जाऊ शकतो.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील स्थानाच्या दृष्टीने भारतीय संघासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची आगामी कसोटी मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, 21 जानेवारी ते 3 मार्च 2027 या कानावधीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठित बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या प्रस्तावित वेळापत्रकात मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्याचे यजमानपद रांचीच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमला गमवावे लागू शकते, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात भारताच्या पूर्व भागात सूर्य खूप लवकर मावळतो, ज्यामुळे प्रकाशाची मोठी कमतरता निर्माण होते. अशा परिस्थितीत, कसोटी सामन्यात दररोज अनिवार्य असणारा पूर्ण 90 षटकांचा खेळ आयोजित करणे हे व्यवस्थापनासमोर एक मोठे आव्हान ठरू शकते.
रांची कसोटी धोक्यात येण्याचे मुख्य कारण
पूर्व भारतातील रांचीमध्ये फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात (19-23 फेब्रुवारी) सायंकाळी 4:30 ते 5:00 च्या दरम्यानच अंधार पडतो. यामुळे केवळ खेळण्याचा वेळच कमी होत नाही, तर खेळ न झाल्यामुळे सामना अनिर्णित राहण्याचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढतो. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, अतिथंडीमुळे रांचीमधील खेळपट्टी भारतीय फिरकी गोलंदाजीच्या रणनीतीसाठी फारशी अनुकूल नसेल, असा अंदाज आहे. परिणामी, संघ व्यवस्थापनाने हा सामना रांचीऐवजी अशा ठिकाणी हलवण्याची शिफारस केली आहे, जिथे सूर्यप्रकाश आणि थंडीची फारशी अडचण येणार नाही. या सामन्याच्या यजमानपदासाठी सध्या विशाखापट्टणम, हैदराबाद किंवा राजकोट ही शहरे प्रबळ दावेदार मानली जात आहेत.
गुवाहाटी कसोटीच्या वेळेत बदल शक्य
दरम्यान, मालिकेतील तिसरा कसोटी सामना 11 ते 15 फेब्रुवारी दरम्यान आसाममधील गुवाहाटी येथे होणार आहे. ईशान्य भागातच असलेले गुवाहाटी आपले यजमानपद कायम ठेवण्याची शक्यता आहे, कारण तेथे वेन्यू बदलला जाणार नाही. तथापि, थंडी आणि अंधाराचा विचार करता गुवाहाटी कसोटी सामन्याची वेळ बदलली जाऊ शकते आणि हा सामना नेहमीपेक्षा अंदाजे 30 मिनिटे लवकर सुरू केला जाऊ शकतो.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2027: प्रस्तावित वेळापत्रक
- पहिली कसोटी (21-25 जानेवारी): VCA स्टेडियम, नागपूर
- दुसरी कसोटी (29 जानेवारी – 2 फेब्रुवारी): एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
- तिसरी कसोटी (11-15 फेब्रुवारी): ACA स्टेडियम, गुवाहाटी (सामन्याच्या वेळेत बदल होऊ शकतो)
- चौथी कसोटी (19-23 फेब्रुवारी): JSCA स्टेडियम, रांची (सामन्याचे ठिकाण बदलण्याची दाट शक्यता)
- पाचवी कसोटी (27 फेब्रुवारी – 3 मार्च): नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद